कोल्हापूर : आपली संस्कृती वाढावी, हा मुख्य उद्देश समोर ठेवून पीठाच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन केल्याची माहिती विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज दिली.
येथील शंकराचार्य पीठाच्या वतीने मराठी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येते. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वामीजी बोलत होते. स्वामीजी म्हणाले की, आपल्या मराठी महिन्यांची परंपरा तरुण पिढीसह सर्वांना कळावी यासाठी ही दिनदर्शिका गुढीपाडव्याला प्रसिद्ध केली जाते. त्यात मराठी सण, तिथीनुसार, उत्सवांची माहिती आहे. या वर्षी अधिक महिना असल्याने त्याचीही विस्ताराने माहिती यामध्ये दिली आहे.
दरम्यान, पीठात स्वामीजींच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी यज्ञेश्वर शास्त्री व सचिव शिवस्वरूप भेंडे आदी उपस्थित होते. सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या दिनदर्शिकेसाठी ज्योतिष विशारद महेंद्र इनामदार, बाबासाहेब खाडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. दिनदर्शिकेसाठी पीठ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही भेंडे यांनी यावेळी केले.