भारत असा एक देश आहे जेथे विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाची परंपरा, सण साजरी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मात्र हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक असलेला गुढी पाडवा आज संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. या दिवसापासून चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला हिंदू नववर्षाची सुरुवात होते. गुढी पाडवा भारतातील विविध भागात वेगवेगळ्या नावाने जसे छेकी चांद, उगादी अशा नावाने ओळखले जाते. तर जाणून घेऊयात गुढी पाडव्याचा सण का साजरा केला जातो आणि त्यामागील धार्मिक मान्यता काय आहे.
महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा सण मोठ्या धुमधामात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या घराबाहेर गुढी उभारुन त्याची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, या दिवशी विशेष पूजा केल्याने येणारे नवं वर्ष सुख, शांति, समृद्धी आणि सौभाग्य लाभते.
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभुषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या, देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं.
गुढीपाडव्याचे महत्व –
गुढीपाडव्याशी फक्त सांस्कृतिक, धार्मिक गोष्टीच जोडलेल्या नाहीत तर त्यात निसर्गाचा, पर्यावरणाचाही विचार आहे. आल्हाददायक वसंत ऋतूनंतरचा उन्हाळा बाधू नये, म्हणून वर्षांच्या सुरुवातीलाच कडुनिंबाची पाने खावीत, असे सांगितले आहे. सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, असे समजले जाते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो.
गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधूनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातात. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो.
गुढीपाडव्याचा इतिहास…
गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा (गुढीपाडवा इतिहास) सांगितल्या जातात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरूवाताला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पुजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा का साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पुजा केली जाते.
नववर्षाच्या स्वागतासाठी उभारली जाते गुढी…
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. ज्यामधून विजयपताका उभाल्याचा आनंद व्यक्त होत असतो. घराबाहेर रांगोळी काढली जाते.