कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : भाजी बाजारामध्ये जे विक्रेते नियमांचे पालन करीत नाहीत त्यांना बाजारात विक्री करू देऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत आमदार चंद्रकांत जाधव यांनी इशारा दिला.
बारामती येथील भाजी विक्रेत्याच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर श्री. जाधव यांनी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासोबत बैठक घेऊन शहरातील भाजी बाजारांचा आढावा घेतला. ते म्हणाले, प्रत्येक भाजी विक्रेत्यास सोशल डिस्टटिंग तर ठेवण्यास सांगा शिवाय मास्क, हँडग्लोज व सॅनिटायझरचाही वापर करण्यास सांगा. इतकेच नाही तर मटण, चिकन विक्रेत्यांनाही योग्य ती खबरदारी घेण्यास सांगा. रेशन धान्य दुकानाबाहेरही गर्दी होऊ देऊ नका, अशी सूचना त्यांनी केली.
ग्राहकांनीही बाजारात येताना सुरक्षेच्या उपाययोजना अवलंबून घराबाहेर पडावे, असे आवाहनही श्री. जाधव यांनी यावेळी केले. शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये आज जरी टँकरच्या माध्यमातून औषध फवारणी सुरू असली तरी तेथे मर्यादा येतात, यासाठी पुन्हा हातपंपांच्या माध्यमातूनही औषध फवारणी करावी, असेही आमदार जाधव यांनी यावेळी सांगितले.
आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले की, शहरातील विक्रेत्यांची संख्या वाढवू देऊ नका. ग्राहकांनीही सुरक्षित अंतर राखून भाजी खरेदी करावी. याचबरोबर शहरात कोणीही मोफत भाजी वाटू नये. त्यामुळे गर्दी वाढून पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने असे प्रकार होऊ देऊ नका. पुढील १५ दिवस आपण जर काळजी घेतली तर नक्कीच कोरोनाचा लढा आपण जिंकू, अशा विश्वासही श्री. कलशेट्टी यांनी व्यक्त केला.
भाजी विक्रेत्यांना इतके समजावून सांगूनही ते ऐकत नसतील तर नाईलाजाने का होईना काही दिवस भाजी बाजाराला पूर्णपणे बंदी घालण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
नाही तर , भाजी बाजार बंद

Read Time:2 Minute, 53 Second