Getting your Trinity Audio player ready...
|
- मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क
सोलापूर वार्ताहर – सोलापूर महानगरपालिकेचा जैव वैद्यकीय प्रकल्प ठेका पद्धतीने बायोक्लीन सिस्टीम (इंडिया) प्रा.लि. सोलापूर यांना दिला असून या प्रकल्पावर प्रहार आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
साथीचे रोग पसरू नयेत तसेच मानवी आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी तसेच जनतेच्या हितासाठी सोलापूर महानगरपालिका यांनी बायोक्लीन सिस्टीम (इंडिया) प्रा.लि. सोलापूर यांना भोगवे येथील कचरा डेपो शेजारील जागा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाप्रमाणे जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक, आणि प्रक्रिया व्यवस्थापन करण्यासाठी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तत्वावर नियम आणि अटी घालून ठेका करार पद्धतीने दिला आहे.
परंतु मागील काही वर्षांपासून बायोक्लीन सिस्टीम (इंडिया) प्रा.लि. यांचेकडून वैद्यकीय व्यावसायिकांना जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन सेवेबाबत तक्रारी मिळत आहेत. तसेच कोविड – १९ पासूनचा जैव वैद्यकीय कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाप्रमाणे इन्सीनरेशन प्रक्रिया न करता प्लॅन्ट परिसरात ५० ते ६० टन जैव वैद्यकीय कचरा कोणतीही प्रक्रिया न करता अनधिकृत पुरला असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रहार संघटना सोलापूर आणि शेतकरी संघटना सोलापूर यांच्यावतीने संयुक्तपणे प्लॅन्ट समोर आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात पुरलेला जैव वैद्यकीय कचरा बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली असून दोषींवर कायदेशीर कारवाई करून ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रहार संघटना आणि शेतकरी संघटना यांना मिळालेल्या माहितीनुसार प्लॅन्टवर ५० ते ६० टन जैव वैद्यकीय कचरा मिळाल्यास पावसाचे पाणी झिरपून आजूबाजूचा परिसर आणि भूमीप्रदूषण होऊन पाणी प्रदूषण होणार आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य डोक्यात येणार आहे.
प्रकल्प शेजारी विहीर लागत जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर जळलेले अवशेष असून औषधांच्या बॉटल काचांचा खच पडल्याचे दिसून येते. अशा अनेक कारणांनी प्रहार संघटना आणि शेतकरी संघटनेच्या वतीने काल प्लांटवर आंदोलन करण्यात आले. पुरलेल्या ठिकाणी खुदाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच सोलापूर महानगरपालिका यांचे वतीने आज संयुक्त पाहणी होणार आहे. या प्रकरणामध्ये काही मोठे राजकीय नेते आर्थिक गुंतवणूकीतून गुंतले असल्याची आंदोलन स्थळी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.