तीन उद्योजकांनी केली जागेची नोंदणी
सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र हे उद्योजक आणि कामगार या दोहोंच्याही फायद्याचे आहे. या वर्षअखेरीपर्यंत ही वसाहत अत्याधुनिक सुविधायुक्त अशी मॉडेल औद्योगिक वसाहत बनवली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
आडाळी एमआयडीसी येथे उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी पणजी, गोवा येथे आयोजित गुंतवणूक प्रोत्साहन उद्योजक परिषदेवेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एन. अन्बलगन, गोवा कॉमर्स ऑफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष संदीप भंडारे, गोवा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार कामत, कोल्हापूर येथील शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, सिंधुदुर्ग चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कमलाकर सावंत, उद्योजक अतुल पै-काणे, गजानन सावंत, प्रकाश म्हात्रे, ललित सारस्वत आदी उपस्थित होते.
आडाळी येथील एमआयडीसीमध्ये लवकरच सर्व सुविधा उभारल्या जातील, असे सांगून श्री. केसरकर म्हणाले की, गोव्यातील उद्योजकांना उद्योगांच्या वाढीसाठी एक चांगली संधी आडाळी एमआयडीसीच्या निमित्ताने निर्माण झाली आहे. पाणी, वीज तसेच दळणवळणाच्या चांगल्या सोयी सुविधा या ठिकाणी आहेत. चिपी, मोपा सारखे विमानतळ आणि थिवी, पेडणे, सावंतवाडी सारखी रेल्वे स्टेशन जवळ आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आहे. तसेच बांदा ते आयी हा मार्ग लवकरच 100 फुटी होत आहे. त्यामुळे आडाळी एमआयडीसीला सर्व बाजूने कनेक्टीव्हिटी मिळणार आहे. हे औद्योगिक क्षेत्र डी प्लस झोनमध्ये येत आहे. त्याचा लाभ येणाऱ्या उद्योजकांना मिळेल.
सोयी सुविधा आणि उद्योगांची उभारणी एकाच वेळी होऊ शकते, असे सांगून श्री. देसाई म्हणाले की, आमची स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय महामंडळांशी आहे. सध्या गोव्यामधील उद्योगांना विस्तारासाठी जागेचा प्रश्न भेडसावत आहे. हा प्रश्न आडाळी एमआयडीसीच्या माध्यमातून सुटेल. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही उद्योगांना विस्तारीकरणाचा प्रश्न भेडसावत आहे. या उद्योजकांनी आडाळी एमआयडीसी येथे विस्तारीकरणचा विचार करावा. डी प्लस झोनमध्ये येत असल्यामुळे याठिकाणी चांगल्या सवलती मिळणार आहेत. वीजेचे दर 2 रुपये प्रती युनिट असणार आहेत. या एमआयडीसीसाठी 1 हजार 170 प्रती चौरस मीटर इतका दर जाहीर केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आडाळी येथे उद्योजकांसाठी कॅम्प उभारण्यात येणार आहे. याठिकाणी 5 हजार चौरस फुट ते 50 एकर पर्यंतचे भूखंड उपलब्ध आहेत. दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. तरी उद्योजकांनी याठिकाणी उद्योग उभारण्यासाठी यावे, असे आवाहन उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केले.
श्री.अन्बलगन यांनी आडाळी एमआयडीसी क्षेत्राची माहिती दिली. तसेच याठिकाणी उपलब्ध होणार असलेल्या सुविधांची माहिती देऊन ते म्हणाले की, उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी एमआयडीसी कायमच तत्पर असते. सात दिवसांच्या आत कोणतीही समस्या सोडवली जात आहे.
शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यश्र सुरेंद्र जैन, उद्योजक अतुल पै-काणे, गजानन सावंत, प्रकाश म्हात्रे, ललित सारस्वत यांनी आडाळी एमआयडीसीमधील गुंतवणूक कशी फायद्याची ठरणार आहे याची सविस्तर माहिती दिली. पै-काणे इंटस्ट्रिज यांनी 25 हजार चौरस फुटाच्या जागेची, सुजित परुळेकर यांनी 10 हजार चौरसफूट जागेची तर आणखी एक उद्योजकांने 10 हजार चौरस फुट जागेची नोंदणी केली.
या एमआयडीसीसाठी भूखंडाचे दर पुढीलप्रमाणे असणार आहेत. औद्योगिक वापरासाठी 1170 रुपये प्रति चौरस मीटर, निवासी वापरासाठी 1755 रुपये प्रती चौरस मीटर व वाणिज्य वापरासाठी 2345 रुपये प्रति चौरस मीटर असे आहेत.