शाहू क्रीडा मंडळ पन्हाळा यांच्या वतीने “दिलीप चषक” व्हॉलीबॉल स्पर्धा या दिवसी…

पन्हाळा प्रतिनिधी / शहादुद्दीन मुजावर 

येथील शाहू क्रीडा मंडळ पन्हाळा यांच्या वतीने व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने शिवछत्रपती पुरस्कार विजेते कै. दिलीप जोशी (सर) यांच्या स्मरणार्थ “दिलीप चषक” या २१ वर्षाखालील युवक व युवतींच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मंडळाची सचिव पराग जोशी व सहसचिव सोपान गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisements

पन्हाळ्याला ज्याप्रमाणे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे त्याचप्रमाणे व्हॉलीबॉल चा

देखील इतिहास फार मोठा आहे. आज पर्यंत शाहू क्रीडा मंडळाच्या माध्यमातून स्वर्गीय दिलीप जोशी यांनी व्हॉलीबॉल साठी फार मोठे योगदान दिलेले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने २६ राज्यस्तरीय ४ राष्ट्रीय स्तरीय तर ६ जिल्हास्तरीय स्पर्धांचे एकूण ३६ स्पर्धांचे नेटके नियोजन पार पाडलेले आहे आजपर्यंत दिलीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे वतीने ४९ राष्ट्रीय खेळाडू तर १७०च्या आसपास राज्यस्तरीय खेळाडू घडविण्याचे काम करण्यात आले आहे .तर मंडळाचे काही खेळाडू सरकारी खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत देखील आहेत .शाहू क्रीडा मंडळाची दरवर्षी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याची परंपरा जोशी सरांनी अखंडित ठेवली होती. पण कोरोना काळात व त्यानंतर सरांचे निधन झाल्याने स्पर्धेला खंड पडला. मात्र सरांच्या पश्चात व्हॉलीबॉल खेळ पन्हाळगडावर जिवंत राहावा व मंडळाकडून उच्च दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

त्याच अनुषंगाने स्वर्गीय दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ दिनांक 2५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान २१ वर्षाखालील युवक व युवतीच्या दिलीप चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, कोल्हापूर ,पुणे ,लातूर, छत्रपती संभाजीनगर ,अमरावती आणि नागपूर या आठ विभागाचे युवक व युतीचे मिळून १६संघ सहभागी होणार आहेत .या स्पर्धेसाठी या सर्व खेळाडूंची तसेच प्रशिक्षक आणि व्यवस्थापक व स्पर्धेसाठी राज्यस्तरावरील येणारी पंच अशा ३०० लोकांची राहण्याची व जेवणाची मंडळाकडून करण्यात आलेली आहे .या स्पर्धेतील सर्वसामान्य हे डे नाईट खेळवले जाणार असून क्रीडांगणाचे देखील काम अंतिम टप्प्यात आले असून प्रेक्षकांसाठी प्रशस्त अशी बाल्कनी देखील उभारण्यात आले असल्याचे पराग जोशी यांनी सांगितले. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २५ फेब्रुवारी रोजी तर पारितोषिक वितरण समारंभ २७ फेब्रुवारी रोजी अंतिम सामन्यानंतर होणार आहे .या कार्यक्रमासाठी देखील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत .या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष माहिती गायकवाड, सुहास आडनाइक, सागर गोसावी ,रामानंद गोसावी ,मुतंजर मुजावर यांच्यासह मंडळाचे सर्वच पदाधिकारी व खेळाडू परिश्रम घेत आहेत.

स्वर्गीय दिलीप जोशी यांच्या पश्चात प्रथमच शाहू क्रीडा मंडळाकडून राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याने महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून ही एक व्हॉलीबॉल रसिक व क्रीडा प्रेमींसाठी चांगली संधी ठरणार आहे. तरी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन शाहू क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *