कोल्हापूर : अन्नधान्य वितरण कार्यालय कोल्हापूर शहर यांच्या पथकाने आज दिनांक 8 जून 2024 रोजी शहरातील तीन ठिकाणी एकाच वेळी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई करुन 73 घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, तसेच पाच रिफिलिंग करण्याच्या मोटर्स, चार वजन काटे इत्यादी अंदाजे 1 लाख 45 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली.
ग्राहक दक्षता फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीनंतर 15 मे 2024 रोजी मंगळवार पेठेतील गुलाब गल्ली येथे कपिल मिठारी यांच्या निवासस्थानी अशीच कारवाई यापूर्वी करण्यात आली होती. अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षकांनी शहरातील अशा अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनची माहिती प्रत्यक्ष फिरून गोळा शहरात अनेक ठिकाणी असे अवैध गॅस रिफिलिंग स्टेशन कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.
दिनांक 8 जून रोजी अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोल्हापूर शहरातील ओढ्यावरील गणपती मंदिर मागील गल्लीत महादेव खंडेराव शिंदे यांच्या उद्यम नगरातील अवैध गॅस रिफिलिंग स्टेशन वर, रंकाळा स्टॅन्ड मागे साई बाबा मंदिरा शेजारी नारायण सुगंधराव कांबळे यांच्या अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर तसेच जाधव हॉस्पिटल बोळीत मुस्लिम बोर्डिंग समोर तानाजी तुकाराम आरडे यांच्या अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर एकाच वेळी सकाळी 9 वाजताच्या सुमारास छापे टाकून एकूण 73 घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, तसेच पाच रिफिलिंग करण्याच्या मोटर्स, चार वजन काटे इत्यादी अंदाजे एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. तीनही अवैध गॅस रिफिलिंग स्टेशन चालवणाऱ्या व्यक्तींवर आयपीसी कलम 285 कलम 286 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम तीन व पाच अन्वये गुन्हा दाखल केला. या पथकामध्ये पथक प्रमुख नितीन धापसे पाटील यांच्या सह पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम, भाऊसाहेब खोत, अक्षय ठोंबरे मंडळ अधिकारी करवीर संतोष पाटील मंडळ अधिकारी बावडा प्रणाम भगले यांचा समावेश होता. या कारवाईची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांना दिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच यापुढेही अशीच कारवाई करत राहण्याच्या सूचना दिल्या.
कारवाईतील दोन ठिकाणी गणपती मंदिर व मुस्लिम बोर्डिंग अशी संवेदनशील ठिकाणे लागूनच असल्याने अवैध गॅस रिफिलिंग करताना काही दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित वित्तहानी होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते त्यामुळे शहरातील अशा अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयात कळवावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.