कोल्हापूर, दि. 28 : नाशिक आदिवासी विकास आयुक्त यांच्याकडून 23 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी विकास विभागामधील 602 विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे. याची नोंद सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी घ्यावी, असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
आदिवासी विकास आयुक्त महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी 23 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी विकास विभागामधील 602 विविध रिक्त पदांकरिता दिलेल्या जाहिरातीनुसार दिनांक 23 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. या विविध पदांकरीता उमेदवारांचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत. तथापि, सन 2024 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 16, दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) या संवर्गाचा समावेश करुन जाहिरात पुनश्च प्रसिध्द करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार पुनश्च बिंदूनामावली अद्ययावत करुन गट-क संवर्गासाठी पुनश्च जाहिरात प्रसिध्द करण्याबाबत शासन स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आदिवासी विकास विभागाची दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे. याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरु आहे. बिंदूनामावली अद्ययावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येईल, असे आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.