मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन  

सांगली: मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी महानगरपालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांकडून 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेचे अर्ज ‍विनामूल्य असून पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, समाज कल्याण कार्यालय सांगली यांच्याकडून अर्ज उपलब्ध करुन घेवून परिपुर्ण अर्ज त्यांच्याकडेच विहीत मुदतीत सादर करावेत. या योजनेचा सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यास त्याच्या आधारसंलग्न खात्यावर 3 हजार रूपये एकदाच वर्ग करण्यात येणार आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांनी अर्जासोबत आधार कार्ड झेरॉक्स,उपकरण हवे असलेबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, दोन फोटो, जातीचा पुरावा, बँक पासबुक झेरॉक्स, उत्पन्नाचा पुरावा जोडणे आवश्यक असल्याचे श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *