सांगली : मानसिकदृष्ट्या अक्षम व आजारी असणाऱ्या व्यक्तींसाठीच्या कायदे व योजना तसेच सार्वजनिक उपयोगित असणाऱ्या केंद्रशासन व राज्य शासनाच्या योजनांविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्यावतीने तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुमठे येथे कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले. या कार्यकमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग. कांबळे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यकम प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी विशाल कारंडे यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सहा. गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी उपस्थितांना शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सविस्तर माहिती दिली. विस्तार अधिकारी सुनिल पाटील यांनी प्रधानमंत्री आवास घरकूल योजना, इंदिरा आवास योजना व इतर शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. ग्रामसेवक जमीर पटेल यांनी पेन्शन योजनांबद्दल माहिती सांगितली. टी. डब्ल्यू. जे. फाउंडेशन आशिप कांबळे यांनी उपस्थितांना मानसिकदृष्ट्या अक्षम व आजारी असणाऱ्या व्यक्तींसाठीच्या कायदे व योजनांबाबत माहिती दिली. तसेच एकात्मिक बाल विकास च्या वर्षा परमारकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन करून महिलांसाठीच्या विविध योजना, बालविकास विभागाच्या योजनांची माहिती दिली.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन विजय कोगनोळे यांनी केले. आभार नितिन आंबेकर यांनी मानले. जनगागृती शिबिराचे सर्व नियोजन ग्रामपंचायत कुमठेचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी केले. या शिबिरास ग्रामपंचायत कुमठेचे सदस्य, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.