गांधीनगर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : भरधाव माती भरून आलेल्या टेम्पोने स्विफ्ट कारला जोरदार धडक दिल्याने शुभम शशिकांत भोसले (वय २६ , रा.ग्रामपंचायतीसमोर,सरनोबतवाडी) हा कारचालक ठार झाला.
हा अपघात उचगाव (ता. करवीर) येथील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजनजीक असलेल्या जकात नाक्याजवळ मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झाला. दरम्यान, टेम्पोचालक (नाव समजू शकले नाही) पसार झाला असून त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
टेम्पो (क्र.एम एच ०८ डब्ल्यू ८२९२ ) माती भरून उचगावकडे भरधाव वेगाने येत होता. शुभम भोसले कोल्हापूरकडे स्विफ्ट कारने (क्र. एम एच ०९ – एफ जे ५९०० ) जात होता.
या कारला भरधाव आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. त्यात शुभम याच्या हातापायासह डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले.
या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत टेम्पो व कारचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघाताची वर्दी प्रेम रामराव भोसले (रा. मनीषा कॉलनी, सरनोबतवाडी) यांनी बुधवारी दुपारी दिली असून टेम्पो चालकाविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार आनंद शिंदे करत आहेत.
टेम्पोने कारला दिलेल्या धडकेत सरनोबतवाडीचा तरुण ठार , उचगाव जकात नाक्याजवळील प्रकार

Read Time:2 Minute, 0 Second