कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी ग्रामीण पूर्व जिल्ह्याचे अधिवेशन आज चोकाक याठिकाणी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी सुरेश हाळवणकर,शौमिका महाडिक यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचा विकास अधिक गतीने होत आहे. राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना यशस्वीरित्या राबविल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार तयारी करूया आणि पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करूया, असा निर्धार करूया याविषयी चित्रा वाघ यांनी मार्गदर्शन केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते, देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, आमचे मार्गदर्शक चंद्रकांत दादा पाटील व राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भाजपाचे मजबूत संघटन निर्माण केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य दिले आहे. या अनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व मधून ‘कमळ’ या चिन्हाचा उमेदवार पक्षाने द्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या सर्व मतदार बंधू-भगिनींनी महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. हाच विश्वास आणि उत्साह आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवूया, असे मत मा.शौमिका महाडिक यांनी व्यक्त केले.
या अधिवेशनासाठी पन्हाळा-शाहूवाडी, शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, जयसिंगपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.