मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
सांगली दि.२७, भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी
राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. संविधान अमृत महोत्सव सन 2024-2025 हर घर संविधान या अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भारतीय संविधानाची प्रस्ताविका भेट दिली.
यावेळी विविध पथक प्रमुखांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, अग्निशमन दल, शाळांचे पथक, पोलीस दल बँड पथक, दंगल विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक वाहन, अग्निशमन वाहन आदि पथकांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.