दिल्लीतील महाराष्ट्र सदनात खासदार धनंजय महाडिक यांच्या सौजन्याने ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप..

0 0

Share Now

Read Time:8 Minute, 4 Second

Media control news network

नवी दिल्ली, ६ : महाराष्ट्र सदनात दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा आज, कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाच्या ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते गणेशाची आरती संपन्न झाली. कोपर्निकस मार्गावर काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने गणरायाला निरोप देण्यात आला. यंदा महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने दिल्लीतील मराठी बांधवांमध्ये विशेष उत्साह संचारला होता. या उत्सवाने मराठी संस्कृती आणि पर्यावरण जागरूकतेचा ठसा दिल्लीत उमटवला.

निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद कोलपते आणि त्यांच्या सदस्यांनी या उत्सवाचे यशस्वी नियोजन केले. २७ ऑगस्ट रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. दहा दिवस चाललेल्या या उत्सवात भक्ती, सांस्कृतिक जल्लोष, सामाजिक उपक्रम आणि पर्यावरण जागरूकतेचा अनुपम संगम अनुभवायला मिळाला.

सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष

उत्सवादरम्यान महाराष्ट्र सदनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. यामध्ये दिपाली काळे यांचा ‘कलारंग’, देबू मुखर्जी यांचा हिंदी गीतांचा कार्यक्रम, डॉ. पं. संजय गरुड यांचा ‘संतवाणी’, मराठी-हिंदी नृत्याविष्कार, नितीन सरकटे यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम आणि नागपूरच्या ‘सूर-संगम’ संस्थेच्या सचिन ढोमणे व सुरभी ढोमणे यांच्या संगीतमय प्रस्तुतीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. धनंजय जोशी यांच्या भक्तिगीतांनीही उपस्थितांची मने जिंकली.

खासदार धनंजय महाडिक यांच्या सौजन्याने कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाने पारंपरिक ढोल-ताशा, लाठी – काठी, दांडपट्टा हे मैदानी खेळ तसेच लेझीम आणि झांज वादनासह पर्यावरण पूरक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या पथकातील मुला-मुलींचा उत्साहपूर्ण सादरीकरण आणि पर्यावरण संदेश यांनी सर्वांना प्रभावित केले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी या पथकातील कलाकारांचा विशेष सत्कार केला.

मान्यवरांचे दर्शन

गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवरांनी महाराष्ट्र सदनाला भेट दिली. यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार धनंजय महाडिक, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, माजी राज्यपाल रमेश बैस, दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, बल्गेरियाचे भारतातील राजदूत निकोलाय यान्कोव आणि त्यांचे शिष्टमंडळ, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांचा समावेश आहे. दिल्लीतील विविध राज्यांच्या निवासी आयुक्तांनीही दर्शन घेत मराठी संस्कृतीचे कौतुक केले.

विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरचा ढोल-ताशांचा गजर

विशेष व्यवस्था कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या सौजन्याने विसर्जनाच्या दिवशी  कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाच्या ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीम-झांजच्या तालात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने दिल्लीच्या रस्त्यांवर मराठी संस्कृतीचा उत्साहपूर्ण जल्लोष पसरवला. पथकाने सादर केलेल्या पर्यावरण पूरक प्रात्यक्षिकांनी मिरवणुकीला सामाजिक संदेशाची जोड दिली.

स्वयंसहायता गटांचे हस्तकौशल्य दालन

निवासी आयुक्त आर. विमला यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वयंसहाय्यता गटाच्या हस्तकौशल्य दालनाने उत्सवाला विशेष रंगत आणली. नाशिक, बीड आणि पालघर येथील गटांनी खादी, बटिक, बांधनी, वारली चित्रकला, चामड्याची उत्पादने, दागिने आणि पारंपरिक खाद्यपदार्थ सादर केले. लाइव्ह किचनमध्ये सुजाता जाधव आणि धनश्री यांच्या कोकणी उकडीचे मोदक आणि बटाटा वडे यांनी विशेष आकर्षण वेधले. अमृतवला महिला गट, सावित्रीबाई फुले गट, विराज खादी उपक्रम, वारली आर्ट समूह, रंजना जाधव, यास्मीन शेख आणि जयप्रकाश सी. हनवंते यांच्या उत्पादनांना दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दालनाने स्थानिक कारागिरांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

सामाजिक उपक्रम

उत्सवात वनराई फाऊंडेशन आणि महाराजा अग्रसेन हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने ३ आणि ४ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि नेत्र तपासणी यासारख्या सुविधांनी अनेकांनी लाभ घेतला. निवासी आयुक्त आर. विमला यांनी उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे आभार मानले. विशेषत: अपर निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांचे सहकार्यासाठी, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक मनीषा पिंगळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकार यांचे प्रसिद्धीसाठी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष आभार व्यक्त केले. त्यांनी पुढील वर्षीही असाच उत्साह आणि सामाजिक संदेशासह उत्सव साजरा होईल, अशी आशा व्यक्त केली.

—–जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात—- 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *