कोल्हापूर प्रतिनिधी/ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहासविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एका अभ्यासू, सखोल विचारांच्या व्यक्तिमत्त्वाची उणीव कायमची भासणार आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले. यावेळी त्यांनी डॉ. पवार यांच्या कार्याची आठवण काढत, “इतिहासाला नव्या दृष्टीने मांडणारा एक अभ्यासक आपण गमावला,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

डॉ. पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान त्यांच्या दोन्ही कन्या व कुटुंबीय उपस्थित होते. कोल्हापूरसारख्या सांस्कृतिक भूमीला डॉ. पवार यांच्या रूपाने एक द्रष्टा संशोधक लाभला होता. त्यांनी वर्षानुवर्ष अंधारात राहिलेल्या अनेक महापुरुषांच्या इतिहासाला उजाळा देत समाजासमोर मांडले.
त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशी भावना खासदार महाडिक यांनी व्यक्त केली.
