कोल्हापूर — सहकार चळवळ ही महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा मानली जाते. या चळवळीत महिलांचा वाढता सहभाग आणि त्यांचे सक्षमीकरण याला अधिक बळ देण्यासाठी राज्यस्तरावर एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने येत्या ३ एप्रिल रोजी कोल्हापुरात ‘सहकार समूह पुरस्कार सोहळा’ आणि एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामागे सहकार क्षेत्रात कार्यरत महिलांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीचा गौरव करण्याबरोबरच त्यांना व्यावसायिकदृष्ट्या अधिक सक्षम बनविण्याचा उद्देश आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीत महिलांनी केवळ सहभाग नोंदविण्यापेक्षा नेतृत्वाच्या भूमिकेत यावे, यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमांतर्गत विविध गटांमध्ये पुरस्कार प्रदान केले जाणार असून, ‘बेस्ट सीईओ’, ‘बेस्ट विशेष विक्री अधिकारी’ यांसारख्या सन्मानांचा समावेश आहे. प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये, तसेच इतर पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्कार सोहळ्याबरोबरच आयोजित कार्यशाळेत सहकार कायद्यातील अपेक्षित बदल, व्यवसायासाठी निधी उभारणी, प्रभावी विपणन तंत्र, प्रकल्प अहवाल तयार करण्याची पद्धत, तसेच उत्पादनाची गुणवत्ता आणि पॅकेजिंग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सहकार क्षेत्रातील महिलांसाठी अशा प्रकारचा पुरस्कार व प्रशिक्षण उपक्रम राज्याच्या इतिहासात प्रथमच आयोजित केला जात असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
हा कार्यक्रम कोल्हापुरातील आनंद भवन सायबर कॉलेज सभागृहात आयोजित करण्यात येणार असून, सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. इच्छुकांनी 7888281251 किंवा 9822269813 या दिलेल्या संपर्क क्रमांकांवर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सहकार क्षेत्रातील महिलांच्या क्षमतेला योग्य दिशा देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक
शशिकांत राजोबा आणि सौ. अरुंधती महाडिक
सागर चौगुले, जवाहर छाबडा, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, चार्टर्ड अकौंटंट शिवराज मगर उपस्थित होते.
