मुंबई, दि. १६ : राज्यातील जलसंधारण चळवळीला बळ देत दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी ‘पाणी फाउंडेशन’ने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने या संस्थेने उभारलेली जनसहभागाची चळवळ उल्लेखनीय असून, आगामी काळातही त्यांच्या सहकार्याने ‘पाणीदार महाराष्ट्र’ घडविण्याचा संकल्प साकार करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण उपक्रमांबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, तसेच अमित चंद्रा आणि विलास शिंदे आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि कृषी विभागातील अधिकारीही सहभागी झाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हवामान संशोधन करणाऱ्या विविध संस्थांनी यंदा ‘एल निनो’चा प्रभाव जाणवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात सुमारे ८० टक्के पावसाचा अंदाज गृहीत धरून जलसंधारण कामांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. पाणी फाउंडेशनच्या पूर्वीच्या कार्याचा अनुभव लक्षात घेता त्यांच्या माध्यमातून यंदाही शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये जलसाक्षरतेची चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाण्याचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन फाउंडेशन सातत्याने कार्यरत असून या उपक्रमांना शासनाच्या विविध यंत्रणांनी सक्रिय सहकार्य करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. जलसंधारणाच्या कामांत मृद व जलसंधारण विभागाचा अधिक सक्रिय सहभाग असावा, तसेच कामांचा दर्जा राखण्यासाठी आवश्यक नियंत्रण आणि पडताळणी यंत्रणा उभारावी, असेही त्यांनी नमूद केले. यासाठी कृषी सहाय्यक तसेच ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद’ अभियानातील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली व्यवस्था उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी संस्थेच्या कामांचा आढावा सादर केला. यावेळी संस्थापक आमिर खान, किरण राव आणि अमित चंद्रा यांनीही जलसंधारण उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपली मते मांडली.
फाउंडेशनच्या माहितीनुसार, राज्यभर स्वयंसेवक तत्त्वावर १३,१२१ शासकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे, तर ‘फार्मर कप’ निवासी प्रशिक्षणात १६,२६० शेतकरी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ५७.५६ टक्के महिला शेतकरी असून ११,०९५ निमंत्रकांनीही नोंदणी केली आहे.
