पणजी/ प्रतिनिधी, गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची उघडपणे आर्थिक फसवणूक होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, बोटिंग आणि स्कुबा डायव्हिंगच्या नावाखाली पर्यटकांना अक्षरशः लुबाडले जात आहे. स्वस्त आणि आकर्षक पॅकेजेसचे आमिष दाखवून पर्यटकांना जाळ्यात ओढले जाते आणि नंतर त्यांच्यावर दमदाटी करून पैसे उकळले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
**आमिष पॅकेज, पण सुविधा शून्य!**

मिळालेल्या माहितीनुसार, काही बेकायदेशीर एजंट्स ‘बोटिंग’, ‘स्कुबा डायव्हिंग’ आणि ‘नाश्ता-जेवण’ यांचा समावेश असलेली स्वस्त पॅकेजेस देण्याचे आमिष दाखवतात. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचल्यानंतर पर्यटकांना दिलेल्या आश्वासनांचा मागमूसही नसतो. सुविधा अपुऱ्या, व्यवस्थापन अस्ताव्यस्त आणि पर्यटकांची पूर्णपणे दिशाभूल केली जाते.
**पैसे द्या नाहीतर ॲडव्हान्स जप्त – उघड उघड धमक्या!**
जेव्हा पर्यटक याबाबत जाब विचारतात, तेव्हा त्यांना उघडपणे धमकावले जाते. “उरलेले पैसे दिले नाहीत तर तुमचे आधी दिलेले अॅडव्हान्स (सुमारे २,००० रुपये) जप्त केले जातील,” अशा शब्दांत पर्यटकांना दडपण आणले जाते. या प्रकारामुळे पर्यटकांना मानसिक त्रासासोबतच आर्थिक फटका बसत आहे.
**फसवणुकीचे नवे फंडे!**
काही प्रकरणांमध्ये तर पर्यटकांना ‘दर्पण’ किंवा अन्य किरकोळ वस्तू देऊन त्यांची थट्टा केली जात असल्याचे प्रकारही उघड झाले आहेत. या सगळ्या प्रकारांमुळे गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला मोठा तडा जात असून पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
**प्रशासन गाढ झोपेत? कारवाई कधी?**
इतक्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू असताना स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभाग नेमके काय करत आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पर्यटकांची सुरक्षा आणि विश्वास धोक्यात आला असताना संबंधित यंत्रणांची निष्क्रियता चिंताजनक ठरत आहे.
**पर्यटकांनी सावध राहा!**
* कोणत्याही अनोळखी एजंटला आगाऊ पैसे देऊ नका.
* फक्त नोंदणीकृत आणि अधिकृत पर्यटन संस्थांकडूनच बुकिंग करा
*दमदाटी किंवा फसवणूक झाल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा.*
दरम्यान, या फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी, अन्यथा गोव्याची पर्यटन प्रतिमा गंभीरपणे मलिन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

