कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये गेल्या काही वर्षात राजर्षी शाहूंचे नाव घेऊन त्यांच्या विचारांच्या उलट वर्तणूक करण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न होत आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःला शाहूप्रेमी म्हणून घेणारे अनेक नेते वास्तविक शाहू महाराजांच्या विचारांचा म्हणजे त्यांचा अपमान करण्याचे कृत्य जाणून-बुजून करत आहेत. नुकतेच कोल्हापुरातील एका तथाकथित पुरोगाम्याने शाहू जयंतीनिमित्त शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार घालताना पायातली पादत्राणे ही काढली नाहीत, इतके तथाकथित पुरोगामी मुजोर झाले आहेत.
याचे छायाचित्र प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरल्यावर शाहू महाराजांच्या नावाने आपल्या राजकारणाचा धंदा चालविणारा हा तथाकथित पुरोगामी नेता आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. हे आत्मक्लेश आंदोलन म्हणजे थोतांड असून मुळात शाहू महाराजांच्या विचारांचा खरा पाइक असता तर राजांच्या तस्विरीला पायात पादत्राणे घालून स्पर्श करायची, मुजोरी त्याने कधीच केली नसती. त्याने शाहू महाराजांचा असा धडधडीत अपमान करूनही, कोल्हापुरातील पुरोगामी भाट तोंडातून ब्र काढत नाही आहेत याची खंत वाटते. यापूर्वीही महानगरपालिकेची शाळा पाडून हॉल बांधणे, शाहू महाराजांच्या इच्छेला तिलांजली देऊन आपल्या इच्छेनुसार त्यांचे स्मारक बांधणे, एक विहीर स्वच्छ करण्यासाठी लाखो रुपये खर्च टाकणे, वादग्रस्त सेफ सिटी प्रकल्प, पदाधिकाऱ्याने स्वतः च्या खाजगी कामाकरिता महानगरपालिकेचा निधी वापरणे, असे शाहू विचारांशी प्रतारणा करणारे अनेक प्रकार कोल्हापूरात घडले आहेत.
या नेत्यांनी केलेल्या मुजोरीमुळे शहरातील शाहूप्रेमी जनता संतप्त असून शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार या राजकारणाचा धंदा मांडलेल्या पुरोगामी नेत्याला कधीच माफ करणार नाहीत, असे पत्र भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले