कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर शहरामध्ये काही दिवसापूर्वी पासून लॉक डाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली होती. तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास शासना -च्या वतीने परवानगी देण्यात आली होती.
सायंकाळी ५ नंतर सर्व व्यवहार बंद करण्यात येत असल्यामुळे व रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने त्याचा फायदा घेऊन रस्त्याने मोबाइलवरून बोलत जाणाऱ्या व्यक्तींच्या हाताला हिसडा देऊन जबरदस्तीने मोबाईल चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी रेकॉर्ड वरील आरोपी तपासण्यासंदर्भात गुन्हे शोध पथकास आदेश दिले.
त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने रेकॉर्ड वरील आरोपी व कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जामीनावर सोडण्यात आलेले आरोपी यांची माहिती घेत असताना रेकॉर्ड वरील गुन्हेगार राज अंजुम मुल्ला व सतीश राजेश बांटूगे हे अशाप्रकारचे गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना मिळाली. सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी रुईकर कॉलनी येथून दोन, वाशी नाका येथून एक व तफोवन मैदानाजवळून एक असे एकूण चार मोबाईल हँडसेट आणि चोकाक येथून एक हिरो स्प्लेंडर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून ओपो ए ५ , सॅमसंग एस ९ , विवो मॉडेल नं १८०४ , जिओनी एफ ९ ,असे चार मोबाईल हँडसेट व स्प्लेंडर मोटारसायकल -१ असा एकूण १०,४००० रुपये किमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्प्लेंडर मोटारसायकल नं. एम एच ०९ सीझेड ९५६९ असा एकुण १,४५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज अंजूम मुल्ला वय २१ ( रा. गणेश आपार्टमेंट , राजेंद्रनागर ,) व सतिश राजेश बाटुंगे वय २२.( रा . कंजारभाट वसाहत , एस एस सी बोर्ड जवळ,मोतीनगर)
सद्या दोघे रा. कदमवाडी कोल्हापूर यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्यावर यापूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यात – २ गुन्हे, राजवाडा पोलीस ठाण्यात -२ गुन्हे, व हातकणंगले पोलिस ठाणे येथे -१ गुन्हा दाखल असल्याचे यावेळी उघडकीस आले.