Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी शरद माळी : गेल्या दशकात व्हर्चुअल करन्सी किंवा क्रिप्टो करन्सी ज्याला मराठीत अभासी चलन असे संबोधले जाते , या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करण्याचा प्रकार त्याच्या कमी वेळात वाढत असलेल्या किमती मुळे जगभर अस्तित्वात आला. या प्रकारामध्ये अग्रेसर असणा-या बिटकॉईन या कॉईनच्या अनेक पटींनी वाढलेल्या भावामुळे त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली .
या दरम्यान जगभरात सुमारे ६५० क्रिप्टो करन्सीच्या कंपन्या अस्तिवास आल्या . या करन्सीचे कॉईन जगभरात मर्यादित स्वरुपात असल्याने व त्याचे नियंत्रण कोणत्याही मनुष्याकडे नसल्याने त्याच्या किंमतीवर कोणाचेही नियंत्रण असु शकत नाही व हे संपुर्ण तंत्रज्ञान मागणी पुरवठा यावर अवलंबुन असते. असे निदर्शनास आले आहे की , क्रिप्टो कॉईन विकत घेवुन त्याची किंमत वाढण्याची वाट पाहणा-या लोकांची मनस्थिती हेरुन काही लबाड लोकांनी क्रिप्टो करन्सी मधील गुंतवणुकीस मल्टी लेवल मार्केटिंग ( M L M ) चा व्यवसाय म्हणुन उदयास आणले आणि यातुनच फसवणुकीच्या प्रकारांना वाव मिळाला.
जिल्हयातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेवुन अनेक एजंटनी अशा लोकाकडुन गुंतवणुक करवून घेतली . कोल्हापूर जिल्हयामध्ये क्रिप्टो करन्सी ( अभासी चलन ) मध्ये गुंतवणुक करुन जास्त प्रमाणात परतावा मिळतो असे सांगुन लोकांना गुंतवणुक करायला भाग पाडण्याचा प्रकार जिल्हयातध्ये चालु आहेत. यामध्ये मल्टी लेवल मार्केटिंगचे ( M L M ) प्रकार असुन यामधुन लोकाना बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीच्या अनेक पटीने वाढलेल्या किमतीचे उदाहरण देवुन इथेरियम व तत्सम कॉईनची किंमत सध्या कमी असुन सदरची क्रिप्टो करन्सी ही इंडियन मार्केट मध्ये लवकरच भारत सरकारव्दारे मान्यताप्राप्त होणार आहे असे सांगण्यात येते. त्यामुळे इथेरियम , स्टेलर , रिपल , झिपकॉईन , झेडकॅश इत्यादी क्रिप्टो कॉईनची किंमत भविष्यात वाढणार असुन, आता यामध्ये गुंतवणुक केल्यास जास्त प्रमाणात परतावा मिळेल असे सांगुन काही लबाड एजंट कोल्हापूर जिल्हयातील लोकाकडुन गुंतवणुक करवुन घेत आहेत .
यामधील सर्व व्यवहार देशाबाहेरील सर्वरव्दारा होत असतात .सदर वॉलेट मध्ये गुंतवणुक करणा – या लोंकाना त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांचे स्वतंत्र अकाउंट तयार करुन दिले जाते . व त्यामध्ये किती कॉईन खरेदी केले व आपण आपल्यापुढे केलेल्या मेंबरचे कमिशन म्हणुन जमा झालेले कॉईन या स्वरुपात दिसत असते . त्यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास बसतो . विशेष म्हणजे कोल्हापूर सांगली या सधन जिल्हयातील बरेच लोक या प्रकारास बळी पडले असल्याचे समजते . मिळालेल्या माहितीप्रमाणे इचलकरंजी , शिरोळ , करुंदवाड या भागातुन अशा एजन्सी मध्ये जास्त प्रमाणात गुंतवणुक झाली आहे.
मा.पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांचेमार्फत कोल्हापूर जिल्हयातील जनतेस अवाहन करण्यात येते की , भारत सरकारकडुन कोणत्याही क्रिप्टो करन्सीस परवानगी देण्यात आलेली नाही . सदर गुंतवणूक कंपन्या या भारताबाहेरुन आपले नेटवर्क चालवतात व कालातरांने बंद पडण्याची जास्त संभावना असते , त्यामुळे गुंतवणुकदारांना नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते , मल्टीलेवल मार्केटिंग असल्याने स्वत: गुंतवणुक केलेले फसलेले लोक आणखी जास्त कमिशन मिळावे म्हणुन इतर लोकांना देखील अमिष दाखवुन गुंतवणुक करण्यास भाग पाडतात, या सर्वांची नंतर परदेशी कंपनीव्दारे फसवणुक होण्याची दाट शक्यता असते . तरी सदर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या फसवणुकीस कोणीही बळी पडु नये, तसेच अशा प्रकारे फसवणुक झाली असल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे .