कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील दोनशे एकर जागा आयटी हबसाठी राखीव ठेवा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून श्री.मुश्रीफ व श्री. पाटील यांनी या मागणीचे पत्र त्यांना दिले.
दरम्यान; उद्योग उभारण्यासाठी जमिनी मिळूनही उद्योग न उभारल्यामुळे रिकामी पडलेल्या जमीनी एमआयडीसीचे स्थानिक अधिकारी काही छोट्या उद्योगांना देण्याच्या प्रयत्नात आहेत, याकडेही उद्योगमंत्र्यांचे लक्ष वेधले.
या पत्रात पुढे म्हटले आहे, कागल – हातकणंगले एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्राचा पूर्ण विकास होत आहे. या औद्योगिक वसाहतीतील शेकडो एकर जमीन विकासकामी फक्त घेऊन ठेवल्या आहेत. आजतागायत या जमिनींवर नियमाप्रमाणे मुदतीत कोणतेही उद्योग उभारले नाहीत. परंतु सातत्याने त्यांना उद्योग उभारण्यासाठी मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीचे एक तृतीयांश क्षेत्र रिकामे आहे. जर हे उद्योग उभारले असते तर रोजगार प्राप्त झाला असता.
दरम्यान बॉम्बे रेयॉन या उद्योगांने आपली जमीन वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. परंतु; सर्वोच्च न्यायालयाने सदरची जमीन एमआयडीसीकडे देण्याचा आदेश दिला आहे. सदर जमीन व उर्वरित विकास न झालेली, अशी एकूण २०० एकर जमीन आयटी हब क्षेत्रासाठी राखून ठेवावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.
चौकट
शरद पवार यांनीही कोल्हापूर दौऱ्यामध्ये असताना कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये आयटी क्षेत्र विकसित करण्यासाठी देशासह जगातील विप्रो, इन्फोसिस यासारख्या नामांकित कंपन्यांशी बोलण्याचीही तयारी दाखवली आहे आहे, असेही पत्रात म्हटले आहे.