कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची दि. २६ जुलै २०२० रोजी जयंतीचे औचित्य साधून नगरसेवक आदिल फरास यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पादत्राणे घालून त्यांना अभिवादन केले असल्याने शाहू महाराज यांचा अवमान झाला आहे. त्याच्या या कृतीचा सिद्धार्थ नगर कृती समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
नगरसेवक आदिल फरास यांनी वरील केलेल्या कृतीबाबत आत्मक्लेश करण्याकरिता राजर्षी शाहू समाधीस्थळ नर्सरी बाग सिद्धार्थ नगर या ठिकाणी बसले होते, या कृतीला विरोध म्हणून भाजप युवा आघाडीतर्फे नगरसेवक विकास खाडे पाटील समाधीस्थळ येऊन कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. आदिल फरास हे शाहू समाधीस्थळी बसले होते, ती जागा भाजप युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र व पंचगंगा नदीच्या पाण्याने धुवून शुद्धीकरण केले.
परंतु शाहू महाराज यांनी ब्राम्हण्यपणाला विरोध केला होता, त्याच ब्राह्मण्यपणाचे समर्थन भाजप युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शाहू समाधीस्थळी येऊन केलेले आहे, ही बाब निंदनीय असून समतेच्या तत्वाला काळीमा फासणारी आहे. आदिल फरास समाधीस्थळी बसलेली जागा गोमुत्राने व पंचगंगा नदीच्या पाण्याने धुवून पवित्र केली, असे म्हणणे नगरसेवक विकास खाडे पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचे आहे. हा विचार अंधश्रद्धेला खत पाणी घालणारा आहेच शिवाय अस्पृश्यता मानण्याचा ही प्रकार आहे. त्यामुळे सिद्धार्थनगर कृती समिती या कृतीचा जाहीर निषेध करीत आहे.
राजर्षी शाहू समाधीस्थळ हे राजकीय आंदोलन करण्याचे केंद्र बनवून देऊ नका, कारण कोल्हापूरची जनता ही शाहूप्रेमी आहे समाधीस्थळाचे पावित्र राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यावर आपण सर्वजण दक्षता घ्याल, ही कृती समितीची अपेक्षा असल्याचे निवेदन कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील विविध पक्ष व सामाजिक संघटना यांना सिद्धार्थनगर कृती समितीच्या वतीने देण्यात आले.
राजर्षी शाहू समाधीस्थळी कोणतेही पक्ष व सामाजिक संघटना यांना आंदोलन करता येणार नाही, तसेच आंदोलन केले, तर संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा आदेश देऊन त्यासंबंधीचा लेखी फलक विनाविलंब शाहू समाधी स्थळ लावण्यात यावा व तसेच महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने शाहू समाधीस्थळ सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून समाधीस्थळी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, त्याचबरोबर रात्रंदिवस कायमस्वरूपी पोलीस शिपाईची नेमणूक करण्यात यावी, असे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनाही कृती समितीच्या वतीने देण्यात आले.
यावेळी सिद्धार्थनगर कृती समितिचे निमंत्रक संजय माळी, सदस्य भारत रुईकर,सुशील कोल्हटकर,स्वाती काळे, सुरज लिगाडे, अमित काळे, यश रुकडीकर, प्रेम कांबळे, अविनाश बनगे हे मान्यवर उपस्थित होते.