मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : राज्यातील लॅबची संख्या दोन वरून १३१ पर्यंत प्रत्येक गावामध्ये कोरोना दक्षता समितीची स्थापना करणार प्रत्येक लॅबमध्ये संशोधनासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोना विषाणूच्या संकटाने सर्व जग ग्रासले असून या विषाणूची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात १३१ प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून, या माध्यामातून महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोच्च व सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य घडविण्याचे स्वप्न असून ते मी घडविणारच असा ठाम निर्धार व विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परीसरात उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, ही प्रयोग शाळा उभारणीसाठी ज्यांचे-ज्यांचे हात लाभले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच कोविड सारखी संकटे येतात आणि जातात संकटात जो पाय रोवून उभे राहतो व पुढे वाटचाल करतो तेच खरे या संकटावर मात करतात. संपूर्ण जग संकटग्रस्त झाले आहे. या संकटात तुम्ही सर्वजण पाय रोवून उभे राहिलात त्यामुळे तुमचे मन:पूर्वक धन्यवाद देतो असे सांगुन ते म्हणाले की, संपूर्ण राज्यात आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा सुरू करीत आहोत.
हा काळ कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा असल्याने कोणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यावी, कारण जोपर्यंत आपल्याकडे व्हॅक्सीन (औषध) आपल्या हाताशी येत नाही, तोपर्यंत आपण विजय मिळवू शकत नसल्याने जनतेला सोबत घेवून आपल्याला पुढे जायचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमप्रकाश राजे निबांळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, जि.प.उपाध्यक्ष धनजंय सावंत, नगराध्यक्ष मकरंदराजे निबांळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्हि वडगावे, कोवीड जिल्हा नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.