कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : संसर्गित कोरोना रुग्णास रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने, रुग्णांचे हाल होतात. रुग्णवाहिका ताबडतोब उपलब्ध व्हावी, अशी कळकळीची मागणी गांधीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य धीरज तेहल्यानी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकाकडे केली.
गांधीनगर बाजारपेठ परिसरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी नियुक्त केलेल्या पथकाने गुरुवारी गांधीनगरमधील शासकीय क्षेत्रीय कर्मचारी कक्षास भेट दिली. त्यावेळी तेहल्यानी यांनी ही मागणी केली. त्यावर रुग्णांसाठी केएमटी बस तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे पथकातील कृषी अधिकारी विश्वास कुराडे, संजय सोनवणे (आरोग्य विभाग मुख्यालय) यांनी सांगितले. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी संसर्गित रुग्णांबद्दल घेण्यात येणारी दक्षता व कामकाजाबद्दल क्षेत्रीय कक्षातील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.
आरोग्य सेवक आनंद कांबळे, वैशाली मोरे यांनी कामकाजाचा अहवाल सादर केला. या कामकाजाबाबत ग्राम समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया घेतल्या. पाहणीअंती क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे काम उत्कृष्ट असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सिंधी सेंट्रल पंचायतमधील क्वारनटाईन हॉललाही पथकाने भेट दिली.