कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर परिसरातील पाच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, गुरुवारी ती दोनशेच्या टप्प्यात म्हणजे १९९ झाली.
दरम्यान, गुरुवारी उचगावपैकी शांतीनगरमधील ५२ वर्षीय शासकीय कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला. यापूर्वीच ७० वर्षीय वृद्ध महिलेचा बळी गेल्याने, उचगावमधील मृतांची संख्या दोन झाली असून गांधीनगर परिसरातील आजअखेर मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. त्यामध्ये वळीवडे येथील मृत झालेल्या हॉटेल व्यावसायिक तरुणाचा समावेश आहे.
मृत शासकीय कर्मचारी हा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सेवेत होता. मधुमेह व रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने, त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण त्याचा कोरोनाने गुरुवारी बळी गेला. सध्या तो उचगावमध्ये राहत नव्हता. तरीसुद्धा उचगावपैकी शांतीनगरमधील परिसर सील केला आहे.

गांधीनगरमध्ये गुरुवारी १० रुग्णांची वाढ झाली. वळीवडे व चिंचवाड येथे प्रत्येकी दोन रुग्ण वाढले. उचगाव व गांधीनगरमध्ये संसर्गाची साखळी वाढत असून, रुग्णसंख्या वाढत आहे.
गांधीनगर बाजारपेठपैकी गडमुडशिंगीमधील रुग्णसंख्या स्थिर आहे. चिंचवाडमधील एक डॉक्टर पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची आई व पत्नीचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला.
गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची गुरुवारअखेरची संख्या अशी :
गांधीनगर (९७), वळिवडे (५३), उचगाव (३०), गडमुडशिंगी (११), चिंचवाड (८) याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९९ वर पोहोचली आहे.
