कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील एकलव्य अलगीकरण कक्षात विनामास्क फूटबॉल खेळणाऱ्या सहा कोरोना बाधितांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकलव्य कोव्हिड काळजी केंद्राचे समन्वय अधिकारी प्रविण राव यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून उमेश चौगुले (वय ३२ रा. पोर्ले), महादेव जयसिंग साळुंखे वय (२७ रा. पोर्ले), गुणाजी बबन पाटील (वय २१), संदीप नामदेव कळंत्रे (वय ३६), वैभव पांडुरंग पाटील (वय २१) व विजय पाटील (वय ३२ सर्व रा. कोतोली) या सहा जणांवर विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधित सहा जणांना कोरोना विषाणूची लागण झालेली आहे, हे माहीत असताना सुध्दा एकजमाव करुन मास्क न लावता पोर्ले विरुध्द कोतोली असे टीमला नाव देवून फूटबॉल खेळ खेळला. कोव्हिड-१९ संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवले जाते.
जिल्ह्यात कोरोनाच्या संदर्भात लागू असलेल्या विविध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच जिल्ह्यात सायंकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत संचारबंदी चालू असताना संबंधितांनी फुटबॉल खेळ खेळल्याने त्यांच्यावर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.