प्रतिनिधी जावेद देवडी
कोल्हापूर ता. 25 : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कोव्हीड केअर सेंटर सुरु केले आहे.
यामधील शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी व अंडी उबवणी केंद्र येथील कोव्हीड केअर सेंटरला आज महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील रुग्णांशी संवाद साधला. याठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती घेऊन त्याबाबत रुग्णांशी चर्चा केली. तसेच सेंटरवरील सुविधेबाबत त्यांच्या सुचनाही ऐकून घेतल्या. तसेच तेथील डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफशीही त्यांनी संवाद साधला.
महापौरांनी या सेंटरमध्ये आत जाऊन स्वत: रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णांना त्यांचे कोणतेही नातेवाईक भेटत नसलेने महापौरांनी त्यांची भेट घेतल्याने त्यांच्या डोळयात पाणी आले होते.
महापौरांनी समक्ष भेट दिल्यामुळे रुग्णांनी महापौरांचे आभार व्यक्त केले. अंडी उबवणी केंद्र येथील कोरोनामुक्त झालेल्या बुरुड गल्ली येथील रुग्णाने व नातेवाईकांनी याठिकाणी असलेल्या सुविधाबाबत समाधान व्यक्त केले. याठिकाणी रुग्णांना आपल्या घरी असल्यासारखे वाटते. येथील स्टाफ सर्वांना चांगली सेवा देतात. वेळच्यावेळी जेवण व नाष्टा मिळतो. कोणत्याही गोष्टीसाठी रुममधून बाहेर जावे लागत नाही. पिण्यासाठी गरम पाणी, वाफ घेण्यासाठी गरम पाणी व इतर सर्व वस्तू रुममध्ये पोहोच केल्या जातात असा अभिप्राय त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर येथील डॉक्टर्स व नर्सशी संवाद साधतांना सर्वानी आपली काळजी घ्यावी. याठिकाणी असलेल्या रुग्णांची काळजी घ्यावी अशा सुचना केल्या.
शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी या सेंटरमधून आत्तापर्यंत 1900 व्यक्तिंना संस्थात्मक अलगीकरण केले होते. तर आत्तापर्यत येथून 700 पॉझीटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. अंडी उबवणी केंद्र येथे आत्तापर्यंत 201 रुग्णांना संस्थात्मक अलगीकरण केले होते. आत्ता येथून 167 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 26 रुग्ण उपचार घेत आहेत.प्रशासक वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांनी यावेळी रुग्णांना सकाळी चहा नाष्टा, दुपारी जेवण, सायंकाळी चहा बिस्कीट व संध्याकाळी जेवण दिले जात असलेचे सांगितले. त्याचबरोबर दैनंदिन सर्वांना पिण्यासाठी गरम पाणी, हळद- दुध दिले जात असलेचे सांगितले. यासर्व सुविधा जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्यावतीने सर्व रुग्णांना मोफत दिल्या जातात.यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता अनिल जाधव, प्रशासक वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, डॉ.विद्या काळे व आरोग्य विभागाचा स्टाफ उपस्थित होते.