प्रतिनिधी: सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : राजकारणातील एक मजबूत नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि कर्तृत्ववान मंत्री आपल्या मधून निघून गेला, अशी आदरांजली केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाबद्दल जागर फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. बी.जी. मांगले यांनी वाहिली. ते वसगडे (ता.करवीर ) येथे केंद्रीय मंत्री स्वर्गीय रामविलास पासवान यांना आदरांजली वाहताना बोलत होते.
राष्ट्रीय राजकारणात पाच दशके ते कार्यरत होते, असे सांगून मांगले म्हणाले की नवीन मित्र जोडणे आणि टोकाचा विरोध न करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यामुळे काँग्रेस असो वा भाजप सर्वांशी त्यांचे गोडीगुलाबीचे संबंध होते. त्यामुळेच काँग्रेसमध्ये व भाजपमध्ये सरकार मध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री पद भूषवले. साधेपणा, सर्व समाजाशी असणारे चांगले संबंध, कामाशी प्रामाणिक, सचोटी, या गोष्टी त्यांच्या टिकाऊ राजकारणाचा पाया होता. बिहारने जे अनेक नेते देशाला दिले त्यात रामविलास पासवान यांचा नामोल्लेख करावा लागेल.
सामाजिक कार्यकर्ते सनातन कांबळे यांच्या हस्ते पासवान यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या प्रसंगी भारत प्रभात पार्टीचे जिल्हाध्यक्ष भीमराव गोंधळी, उदय साळोखे, रफिक शेख आदींची प्रमुख उपस्थित होती.