Getting your Trinity Audio player ready...
|
अवघ्या सहा ते सात इंच लांबीची ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस, आठ बुलेटचा संच, १३५ दुर्मीळ नाणी, प्राचिन मूर्ती, काचेच्या वस्तू आदी ४५७ वस्तू करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणकर्णिका कुंडाच्या उत्खनात सापडल्या आहेत. अजूनही उत्खनन सुरू आहे, त्यातही आणखी काही वस्तू आढळून येतील, या वस्तूंचे संग्रहालय करण्याचा विचार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.हा कूंड ६० बाय ६० फूट असा आहे. कुंडात उतरण्यासाठी दक्षिण आणि उत्तर बाजूने पायऱ्यांच्या दोन वाटा आहेत. या कुंडात ५० विरगळ आहेत तर पाच ओवऱ्या असल्याचे आतापर्यंतच्या उत्खननात आढळून आले आहे. कुंडाच्या चारही बाजूला शिवलिंग आहे. सुमारे १६ पाण्याचे झरे आढळले आहेत. आतापर्यंत साडे दहा मीटर पर्यंतचा गाळ काढलेला आहे, अजूनही तळ लागलेला नाही. सुमारे अडीच ते तीन फुटापर्यंत आणखी खाली गेल्यास तळ लागेल अशी शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यात अंगावर पाच ठिकाणी शिवलिंग असलेली आणि घोड्यावर बसलेल्या पार्वतीची पितळेची दुर्मीळ मूर्ती आहे. मातीच्या सुमारे २५ विविध मूर्त्या आहेत. बौध्द किंवा जैन धर्माशी प्रथमदर्शनी साधर्म्य असलेली आणि केवळ चेहरा असलेली एक दगडी मूर्ती आहे. या उत्खननात काचेचा एक कंदिल आढळला. वैशिष्ट्यम्हणजे काचेचा हा कंदिल पूर्ण सुरक्षित असून काचेवर साधा ओरखडाही पडलेला नाही. अशीच छोटी गणपतीची मूर्तीही आहे. काही टाक आहेत तर सुमारे १३५ तांब्यांची नाणी आहेत. पितळेची टॉर्च, डबे, पेले अशाही वस्तू सापडल्या आहेत. तसेच आठ बुलेटचा संच, एक जिवंत छोटी बुलेट आणि काळ्या रंगाची मेड इन जर्मनी असा उल्लेख असलेली सहा सात इंचाची छोटी पण चालू असलेली रिव्हॉल्वर आढळून आली आहे.
यावेळी देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, अभियंता सुदेश देशपांडे, संशोधक उमाकांत राणिंगा, ॲड. प्रसन्न मालेकर आदी उपस्थित होते.