पितृछत्र हरपलेल्या एका दहा वर्षाच्या मुलाचे पंचगंगा स्मशानभूमीतील घाटावर मुंडन करण्याचा विधी सुरू होता. वडील गेल्याने दाटलेला हुंदका, पाणावलेले डोळे, मनात आठवणींचा कल्लोळ अशा मनस्थितीत असलेला तो कोवळय़ा वयाचा मुलगा ओलेत्या अंगानेच नाभिकासमोर बसला होता. नदीकाठच्या वारयामुळे अंगात हुडहुडी भरली होती. दशविधीसाठी आलेल्यांच्या गर्दीतील संभाजी जाधव अर्थात मिठारी तात्यांच्या मनाला आणि डोळय़ांना थडीने कुककुडणारं ते पोर दिसलं. स्मशानभूमीतून परततानाच तात्यांनी ठरवलं की स्मशानभूमीत गरमपाण्यासाठी सोलर उभा करायचा तोही स्वखर्चाने. ज्यामुळे दहनानंतर होणारया विधीसाठी येणारा कुणीही थडीने गारठणार नाही. सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती आणि गिरणचालक संभाजी जाधव यांनी चार दिवसात हा विचार कृतीत आणला आणि कोणताही गवगवा न करता पंचगंगा स्मशानभूमीत सोलरयंत्रणा उभारली. मिठारीतात्यांच्या या मदतीमुळे आता बारा महिने याठिकाणी गरमपाण्यासोबत माणुसकीच्या मायेची ऊबही दिली आहे.
फुलेवाडी परिसरातील संभाजी जाधव हे व्यक्तीमत्व म्हणजे कुणीही सुखदु:खात मदतीसाठी हाक मारावी आणि संभाजीतात्या तिथे हजर असावेत हे समीकरणच. नातेवाईक, मित्रपरिवार किंवा फुलेवाडी परिसरातील कुणाचेही निधन झाले की त्या अंतयात्रेसोबत तात्या नेहमीच पंचगंगा स्मशानभूमीत येतात. पंधरा दिवसांपूर्वी तात्या एका दहनविधीसाठी नदीवर आले असताना त्यांना दहा वर्षाचा मुलगा वडीलांच्या दशविधीदरम्यान थ्ंडीने गारठलेला दिसला. माणुसकी जपण्यासाठी नेहमी पुढे असलेल्या तात्याचे मन ते दृश्य पाहून अस्वस्थ झाले. परिसरातील अनिल जाधव यांच्यासह काही तरूणांना तात्यांनी ही मनातली खदखद बोलून दाखवली. फक्त हळहळ व्यक्त करून तात्या थांबले नाहीत तर पाण्याच्या टाकीसह सोलर यंत्रणा खरेदी केली. ती स्मशानभूमीत बसवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून परवानगीचे पत्र मिळवले आणि चार दिवसात गरमपाण्याची सोय करूनच तात्या थांबले. स्मशानभूमीत मुंडन करणारया नाभिकांची भेट घेऊन यापुढे मुंडनविधीच्या वेळी कुणीही थड पाण्यामुळे कुडकुडणार नाही अशी सक्त ताकीदही तात्यांनी केली.
मिठारीमळय़ात बरेच वर्षे वास्तव्य असल्यामुळे संभाजीतात्या हे मिठारी तात्या या नावानेच परिचित आहेत. त्यांना कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नाही. रोजच्या गिरणीतून मिळणारया कमाईतून काही ठराविक रक्कम तात्या अशा सामाजिक कामासाठी बाजूला काढून ठेवतात. आजपर्यंत अशाप्रकारे साठवलेल्या पैशातून तात्यांनी अनेकांना मदत केली आहे. तात्यांना बारा महिने गार पाण्याने आंघोळ करण्याची सवय आहे, मात्र बापाच्या निधनानंतर मुंडनविधीसाठी बसलेल्या लहानग्या मुलाची हुडहुडी तात्यांच्या संवेदनशील मनाला जाणवली आणि ता
त्यांनी मदतीचे पाऊल उचललं. जिथे माणसाच्या आयुष्याचा शेवट होतो त्या ठिकाणी येणारया त्या माणसाच्या मुलाबाळांच्या वेदनांवर फुंकर घालणारी तात्यांची ही उबदार मदत खरया अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे
संस्थापक – दत्तू कांबळे अध्यक्ष – विनायक कांबळे – संभाजी पांडुरंग जाधव ( मिठरी तात्या)
सोबत – माणिक शिंदे , विजय कांबळे , अनिल जाधव , राजेंद्र पवार , अनंत कांबळे, रवी कांबळे, एम जी पाटील, सुतार , भोई ,
लोखंडे , भाट , प्रदीप पाटील, मुक्ताई फाऊंडेशनब्लू लिफ सोशल सर्व्हिस श्रीनगरी कॉलनी मधील रहिवाशी उपस्थित होते