सांगली प्रतिनिधी : उद्यापासून सांगली जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज हे पूर्ववत नियमितपणे आणि पूर्ण वेळ चालू होणार आहे. जिल्हा न्यायालयामध्ये आपले काम असेल तेव्हांच आवश्यकता असेल तरच उपस्थित राहून कामकाज चालवणेचे आहे. तसेच कोविड साथीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून सोशल डिस्टंसिंग ठेवण्याचे आहे, असे सर्व वकील तसेच सर्व पक्षकार यांना आवाहन करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज हे कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे गेले काही महिने बंद होते. त्या अनुषंगाने सांगली जिल्हा बार असोसिएशन मार्फत न्यायालयीन कामकाज पूर्ववत व नियमितपणे चालू होणे करता अनेक जिल्ह्यातील बार असोसिएशने दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांना अर्जाद्वारे विनंती करण्यात आली होती. त्याप्रमाणे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांनी हायकोर्टाच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जजेस कमिटीकडे याबाबत कामकाज नियमितपणे व सुरळीतपणे सुरू होण्यासाठी अहवाल सादर केलेला होता. त्यानुसार हायकोर्टाच्या एडमिनिस्ट्रेटिव जजेस कमिटी मार्फत सांगलीसह अकरा जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज हे कोरोना साथीच्या पूर्वीच्या परिस्थितीप्रमाणे न्यायाधीशांच्या व स्टाफच्या १००% उपस्थिती मध्ये सुरू करण्याबाबत आज (सोमवार) निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे उद्या मंगळवारी पासून सांगली जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज हे पूर्ववत व नियमितपणे आणि पूर्ण वेळ चालू होणार आहे.