हेक्टरी १२५ टनापर्यंत ऊस उत्पादन वाढवून राज्यासमोर आदर्श निर्माण करुया
ऊस उत्पादकता वाढ अभियानासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटींचा निधी देणार
ऊस संशोधक, कारखान्यांचे कार्यकारी संचालक, कृषी विभाग व बँक अधिकारी तसेच शेतकऱ्यांच्या सुचनांचा विचार
अभियानासाठी जिल्हा, तालुका ते गाव स्तरावर समित्यांची स्थापना
कोल्हापूर/प्रतिनिधी,
जिल्ह्यात ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी तीन वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ बनविण्यात येणार असून ऊस उत्पादन हेक्टरी १२५ टनापर्यंत वाढवून राज्यासमोर आदर्श निर्माण करुया, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
राज्य शासनाच्या कृषी विभागाची प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) च्या वतीने ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ अभियान’ नियोजन सभा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विभागीय कृषी सहसंचालक तथा रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नामदेव वाकुरे, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश कबाडे व कृषीरत्न पुरस्कार प्राप्त संजीव माने, पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे माजी संशोधक सुरेश माने तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी, कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुरेश कबाडे व संजीव माने, डॉ. भरत रासकर व सुरेश माने यांचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेती पध्दतीत काही बदल करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. साखर काराखान्यांनी देखील यामध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.
ऊस संशोधक, कारखान्यांचे कार्यकारी संचालक, कृषी विभाग व बँक अधिकारी, ठिबक व खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व प्रगतशील शेतकऱ्यांच्या सूचनांचा विचार करुन कृषी विभागाने लवकरात लवकर जिल्ह्याचा मास्टर प्लॅन तयार करण्याबरोबरच जिल्हा, तालुका ते गाव स्तरावर कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समित्या स्थापन कराव्यात. या सर्वांच्या सहकार्याने हे अभियान यशस्वीपणे राबवावे. ऊस उत्पादनात तंत्रज्ञानाच्या वापरासाठी वाढीव पतपुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी बँकांना केल्या.
जिल्हाधिकारी राहूल रेखावार म्हणाले, हेक्टरी कमी ऊस उत्पादन घेणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. यासाठी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा.
कृषी सह संचालक उमेश पाटील यांनी प्रास्ताविकातून अभियानाचा उद्देश सांगून माहिती दिली. ते म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा हे ऊस पीकाच्या उच्चतम उत्पादकतेसाठी जगातील सर्वाधिक अनुकूल भाग आहे. सध्या तीन्ही जिल्ह्याची ऊसाची उत्पादकता सरासरी १०० टन प्रती हेक्टरीपेक्षाही कमी आहे. बेणे बदल, बिजप्रक्रिया, अंतरावर लागवड, जिवाणू खताचा वापर, रोपाद्वारे ऊसाची लागण, ठिबक सिंचन, अंतरपिके, ऊसाचा पाला न काढणे आदी उपाय अवलंबिल्यास हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादन काढता येईल.
रामेतीचे सहायक संचालक ज्ञामदेव परीट यांनी सूचसंचालन केले.
ऊस संशोधक, पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांच्या सूचना
ऊस उत्पादकता वाढ अभियान सभेमध्ये पुरस्कार प्राप्त सुरेश कबाडे व संजीव माने, विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, माजी संशोधक सुरेश माने तसेच प्रगतशील शेतकरी, कृषी व बँक अधिकारी तसेच ठिबक व खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ऊस उत्पादनात हेक्टरी वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सूचना केल्या.
जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रीय, गांडूळ व हिरवळीच्या खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.
ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी नियोजन व्हावे.
उत्पादकता कमी असणारे तालुके व शेतकऱ्यांवर अभियानाचा विशेष भर असावा.
सरींमधील अंतर ४ फुटापर्यंत वाढवणे.
तांबिरा व अन्य रोग न येणाऱ्या ऊस जातींची निवड करणे
रोपांच्या मुळापर्यंत खत देणे.
पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून बियाणे, प्रशिक्षण व तंत्रज्ञान देण्यासाठी सहकार्य होणार
शेतकऱ्यांकरिता पीक स्पर्धा घ्याव्यात. प्रोत्साहनपर अतिरिक्त पतपुरवठा व्हावा.
पूर बाधित क्षेत्रात ऊस व्यवस्थापन व्हावे.
सूपरकेन नर्सरी तंत्रज्ञानाचा वापर करणे.
—————————————————————
जाहीरात
सर्व ग्राहक व हितचिंतकांना दिपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा मोहिते सुझुकी कोल्हापूर,