कोल्हापूर/प्रतिनिधी: असाच स्टेटस का लावलास या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळतिट्टा याठिकाणी आदमापूर आणि मुदाळ या दोन गावातील युवकांमध्ये आज (दि.२८) शुक्रवारी सकाळी तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की असा स्टेटस का लावलास याची विचारपूस केल्याच्या कारणावरून मुदाळ आणि आदमापूर या दोन्ही गावातील युवकांच्यामध्ये शुक्रवारी सकाळी तुंबळ हाणामारी झाली.सकाळची वेळ असल्यामुळे मुरगुड, गारगोटी, मुदाळ, बिद्री, सरवडे, सोळांकुर या ठिकाणी जाणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांचा मोठा जमाव झाला होता. अशा वेळी ही मारामारी झाल्याने सर्वजण एकत्र आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा जमाव झाला
सुरवातीला शाब्दिक चकमक झाली. नंतर हमरीतुमरी व मारामारी झाली. प्रकरण हाताबाहेर जाताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. भुदरगड व मुरगुड पोलिसांनी तत्परता दाखवल्याने जमाव पांगवण्यात यश आले. पोलीस व स्थानिक मध्यस्थांच्या मार्फत सदरचे प्रकरण त्वरित थांबवण्यात आले.हाणामारी झाल्यामुळे प्रवासी ,पालक वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला आहे. त्यामुळे मोबाईलचा दुरुपयोग सुद्धा होऊ लागलेला आहे. मोबाईल वापराचा अतिरेकी झालेला आहे.
त्यामुळे पालकांनी त्या मोबाईल वापरा संदर्भात आपल्या पाल्यांकडे वारंवार चौकशी करून सजग रहावे अशी घटनास्थळी चर्चा होती. दरम्यान या घटनेची भुदरगड पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही.