अर्चना चव्हाण कोल्हापूर/प्रतिनिधी: संजयबाबा घाटगे व माझा गेली अनेक वर्ष संघर्ष झाला. सहा निवडणूका एकमेकांविरोधात लढलो, त्यामध्ये एकदा ते विजयी झाले व पाचवेळा मी जिंकलो. त्यानंतर एका विशिष्ट वळणावर आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्यावर नियतीने केलेला अन्याय तर मी दूर करणार आहेच. तसेच, ये दोस्ती हम नही छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. असा सूर आळवीत कागल तालुक्याच्या विकासासाठी आपला दोस्ताना यापुढेही असाच चालू राहील. असा निर्वाळा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला
वंदूर ता,कागल येथे जाहीर कार्यक्रमात मंत्री श्री मुसली बोलत होते. जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजानेसह साडेसहा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा उदघाटन व सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नपुर्णा साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांना माझी एकच विनंती आहे. मला वैयक्तिक कोणतेही पद देऊ नका. पण आपल्याला ज्यांनी साथ दिली आहे त्या आमच्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्या. त्यांची कामे करा. आपल्या मदतीमुळे उभारलेला अन्नपुर्णा साखर कारखाना तुम्हाला अभिमान वाटेल इतका चांगला चालवू. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मंत्री श्री. मुश्रीफ ज्या उमेदीने समाजजीवनात कार्यरत होते, त्याच उमेदीने किंबहुना; त्याहून अधिक गतीने ते आजही कार्यरत आहेत. जनतेने दिलेली जनसेवेची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडीत आहेत.
“संजयबाबांचे नेतृत्व……..”
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, संजयबाबांचे नेतृत्व हे सत्ता नसतानासुद्धा कार्यकर्ते, जनता सांभाळून ठेवणारे आणि जनतेवर जीव ओवाळून टाकणारे आहे. त्यामुळेच, त्यांचा गट टिकून राहिला. त्या ताकदीवर त्यानी अन्नपूर्णा जॅगरी प्रकल्प सुरु केला. संजयबाबांची ही जिद्द, तळमळ आणि धाडसही कौतुकास्पद आहे.
वंदूरचे ग्रामदैवत हनुमानाच्या साक्षीने मी संजयबाबाना शब्द देतो, तुमचे कार्यकर्ते ते माझेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्यात दुजाभाव केला जाणार नाही. सर्वांनाच ताकद देण्याचे काम करू. माझा स्वभाव सरळ आहे काही गावात माझ्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष आहे. अशा ठिकाणी आम्हा दोघांनाही त्रास होणार आहे. परंतु; तो त्रास बाजूला ठेवून एकोप्याने काम करूया. कारण, आम्ही दोघेही हलक्या कानाचे नाही, मोठ्या मनाचे आहोत. कुणी काहीही सांगितले तरी चलबिचल होणारे आम्ही नाही यावेळी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, धनराज घाटगे, उत्तम कांबळे, कुंडलिक खोडवे यांचीही भाषणे झाली.