केडीसीसी बँकेत जागतिक महिला दिन उत्साहात..

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. ज्येष्ठ संचालिका व माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.

भाषणात माजी खासदार श्रीमती निवेदिता माने म्हणाल्या, आम्ही सर्वजणी सावित्रीबाई फुले यांच्या लेकी आहोत. त्या नसत्या तर आम्ही घडलोच नसतो. प्रतिकूल परिस्थितीचे घाव सोसत त्यांनी दिलेल्या ज्ञानदानामुळेच आमचे अस्तित्व आहे, असेही त्या म्हणाल्या. ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली केडीसीसी बँकेने विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण उन्नतीला सातत्याने प्राधान्य दिले आहे. महिलांच्या सबलीकरणासह सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने बँकेने महिला बचत गटांना केलेला पतपुरवठा राज्य अग्रेसर आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आज मुंबई येथे होत असलेल्या कार्यक्रमात बँकेच्या महिला बचत गटांचा गौरव होत आहे, ही बाब अभिमानास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

Advertisements

 

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने म्हणाले, महाराष्ट्रात एकूण २१ जिल्हा मध्यवर्ती बँका कार्यरत आहेत, त्यापैकी केडीसीसी बँकेत गेले वीस वर्षापासून महिला विकास कक्ष कार्यरत आहे. बँकेने जिल्ह्यातील महिलांच्या संस्थासाठी विविध योजना लागू केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच बँक महिला कर्मचाऱ्यांसाठी विशाखा कमिटी स्थापन केल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक सी. ए. रावण म्हणाले, केडीसीसी बँकेने महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात अर्थ पुरवठा करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.

स्वागत सौ. स्वाती कुंभार यांनी केले. सौ स्मिता अमरे यांनी प्रास्ताविक केले. सौ. गिरीजा पुजारी यांनी आभार मानले.

“माहेरची आपुलकी……”

यावेळी महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसह बचत गटाच्या कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. महिला कर्मचारी व उपस्थित बचत गटांच्या महिला कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. केडीसीसी बँकेत आम्हाला मिळणारी वागणूक म्हणजे माहेरची आपुलकी असल्यासारखे वाटते, अशा भावनाही महिलांनी भाषणांमधून व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *