कोमल शिंगे, कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय डाक कोल्हापूर विभागामार्फत दि. २०-०३-२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्लॅस्टिकचा मानवी जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन भाविकांकडून प्रसादासाठी होणारा प्लॅस्टिक बॅगेचा वापर टाळण्यासाठी भारतीय डाक, कोल्हापूर विभाग व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक कापडी प्रसाद थैली प्रदान करणेचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर यांना भारतीय डाक कोल्हापुर विभागामार्फत भक्तांना देण्यासाठी १०,००० कापडी पिशव्या सुपुर्द करण्यात आल्या. त्या पैकी ५००० कापडी पिशव्या या श्री केदारलिंग ज्योतिबा देवस्थान मंदिर व ५००० कापडी पिशव्या श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर यांना सुपूर्द केल्या हा कार्यक्रम श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे पार पडला.
सदर कार्यक्रम हा मा. वीणा आर. श्रीनिवास (IPoS) मुख्य पोस्ट्मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या शुभहस्ते व मा. श्री. शिवराज नाईकवाडे, सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व कोल्हापूर टपाल विभागाचे प्रवर अधीक्षक श्री. रुपेश सोनावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रमास श्री. रमेश पाटील,प्रवर अधीक्षक सांगली श्री. संदिप कडगावकर, श्री राजेंद्र पाटील, श्री.मडल सर,श्री अमोल शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.