कोल्हापूर/प्रतिनिधी : शेंडापार्क येथील महाराष्ट्र विद्युत मंडळ कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उघडयावर कचरा जाळल्याबदल महापालिकेच्यावतीने दंड करण्यात आला. महानगरपालिकेमार्फत मान्सून पूर्व नियोजनासाठी नाले सफाईचे काम सुरु आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी या कामाची पाहणी करत असताना शेंडापार्क ते आयसोलेशन हॉस्पिटल या मुख्य रस्त्यावरुन त्यांचे वाहन जात असताना रस्त्याच्या बाजूला कचरा जाळला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून पाहणी केली असता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी ऑफिस परिसरातील पालापाचोळा जाळल्याचे निदर्शनास आले. उघड्यावर कचरा जाळल्याप्रकरणी नियमानुसार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना कचरा न जाळण्याबाबत सक्त सूचना दिल्या. संबंधित आरोग्य निरीक्षक यांना या कार्यालयाशी समन्वय ठेऊन त्यांच्या कार्यालय परिसरातील कचरा उठावाबाबत कचरा गाडी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.
नागरिकांनी किंवा शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिसरात गोळा होणारा कचरा, पालापाचोळा त्या भागातील मुकादम किंवा आरोग्य निरीक्षक यांच्याशी संपर्क करून गोळा झालेला कचरा महानगरपालिकेच्या कचरा गाडीमध्ये द्यावा. उघड्यावर कचरा टाकल्यास अथवा जाळल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
—————————– जाहिरात——————————