कोल्हापूर/प्रतिनिधी : गुजरी येथे होणाऱ्या गुजरी सुवर्ण जत्रेची तयारी पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर गुजरी परिसर रोषणाईने उजळला आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व समारंभात जिल्हा प्रशासनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी गुजरी वसवली. त्या पार्श्वभूमीवर गुजरी येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या कालावधीत गुजरी सुवर्ण जत्रा आयोजित केली आहे.
गुजरी सुवर्ण जत्रा समितीतर्फे आयोजित या जत्रेमध्ये सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत दुकाने सुरू असतील. यामध्ये पारंपारिक साज, ठुशी, बुगडी, टीक, राणीहार, चिताक, शिंदेशाही तोडे अशा दागिन्यांबरोबरच देशभरातील सोने-चांदीचे दागिने खरेदीची ग्राहकाला पर्वणी आहे. काही दुकानांमध्ये मजुरीवर १० ते ३० टक्के अशी भरघोस सूटही असणार आहे. गुजरी सुवर्ण जत्रा म्हणजे ग्राहक, पर्यटकांच्या स्वागतासाठी येथे अक्षरशः जत्राच असणार आहे. प्रत्येक दुकान दिवाळीप्रमाणे सजलेले असेल. लक्ष वेधणारी, आकर्षक रांगोळी प्रत्येक दुकानासमोर असेल.
पाणपोई, सरबत आदीची सोय असेल. तीन दिवसांत येथील वाहतूक पूर्णतः बंद असेल. मान्यवर, सेलिब्रिटी जत्रेला भेट देणार आहेत. त्याचबरोबर तीन दिवस गुजरी परिसरात खाऊ गल्लीचे आयोजन केले आहे.
साडेपाच वाजता उदघाटन
दरम्यान, उद्या सायंकाळी साडेपाच वाजता गुजरी सुवर्ण जत्रेचे उदघाटन होणार आहे. गुजरी कॉर्नर भाऊसिंगजी रोड येथे होणाऱ्या या कार्यक्रमास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गिफ्ट, डिस्काऊंट कूपन
शाहू महाराजांच्या १०० व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रोज १०० ग्राहकांना गिफ्ट मिळेलच शिवाय खरेदीवर डिस्काऊंट कूपनही मिळेल.