पोलीस दलाचे काम सुसज्ज व जलद गतीने होण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाकडे १११ वाहने केली प्रदान : गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील

विशेष वृत्त जावेद देवडी

कोल्हापूर, दि .२२, ( प्रतिनिधी )
कोल्हापूर पोलीस दलाचे काम सुसज्ज व जलद गतीने व्हावे, तसेच कोल्हापूर पोलीस दलाने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीवर विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले .जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोल्हापूर पोलीस दलाला १११ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये ४७ चारचाकी व ६४ दुचाकींचा समावेश आहे नवीन वाहने आज शुक्रवारी पोलीस ग्राउंड येथे कोल्हापूर पोलीस दलाकडे प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोल्हापूर पोलीस दलासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांच्या निधीतून, नवीन १११ वाहने खरेदी करण्यात आली आहेत.आज शुक्रवारी पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस क्रीडांगणावर गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे पोलीस दलासाठी ही नवीन १११ वाहने प्रदान करण्यात आली .

प्रारंभी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी या सर्व मान्यवरांच्या हस्ते या नवीन वाहनांचे पूजन करण्यात आले. पोलीस दलाचे मनोबल वाढावे, यासाठी महाविकास आघाडी शासनाने पोलीस दलाला भरीव निधी उपलब्ध करून दिला असल्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले . यापुढील कालावधीतही जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी, तसेच गुन्हेगारी व गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी आवश्यक अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल . अशी ग्वाही ना . सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. इतर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाने विशेष प्रयत्न करावेत, असे ना . सतेज पाटील यांनी नमूद केले .

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या दोन-अडीच वर्षामध्ये कोल्हापूर पोलीस दलासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी ना . सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते निर्भया पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले यांच्याकडे नव्या वाहनांची चावी सुपुर्द करण्यात आली. पोलीस दलासाठी उपलब्ध करून दिलेली नवी वाहने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजाचा इशारा देवून मार्गस्थ करण्यात आली.

या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, गृह पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील,विशेष गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *