अर्जुनी येथे ॲस्टर आधार, आरोग्य विभाग व नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या बाल आरोग्य मोहिमेचा शुभारंभ

0 0

Share Now

Read Time:6 Minute, 42 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी :  बालआरोग्य मोहीमेमुळे व्याधीग्रस्त चिमुकल्यांचे जीवन सुंदर होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केला. गावोगावी होणाऱ्या या मोहिमेत अठरा वर्षापर्यंतच्या मुलांच्या तपासण्या करून त्यांचे भवितव्य घडवा, असेही म्हणाले. अर्जुनी येथे ॲस्टर आधार हॉस्पिटल, आरोग्य विभाग व नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बाल आरोग्य मोहिमेचा प्रारंभ झाला. ॲस्टर आधार हॉस्पिटल- कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बाल आरोग्य मोहिमेचा शुभारंभ अर्जुनी ता. कागल येथे झाला.

      

यावेळी बोलताना संजयसिंह चव्हाण पुढे म्हणाले, या मोहिमेअंतर्गत व्याधीग्रस्त बालकांच्या तपासण्या, शस्त्रक्रिया व औषधोपचारही मोफत होणार आहेत. देशाची भावी पिढी बलवान होण्यासाठी या मोहिमेंतर्गत प्रत्येक बालकाच्या तपासणीसाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शिक्षक व पालकांनीही पुढाकार घ्यावा. फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रेरणेतून आम्ही ही मोहीम राबवित आहोत. ही मोहीम गावांसह वाड्या वस्त्या व घरा-घरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी.  

       गोकुळचे संचालक युवराज पाटील बापू म्हणाले, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेकांना मरणाच्या दारातून परत आणले आहे. या मोहिमेमुळे व्याधिग्रस्त बालकांच्या आयुष्यातील अंधार नाहीसा होऊन नवचैतन्याचा प्रकाश उजळेल. केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, तिरळेपणा मुळे देशात तीन टक्के मुलींची लग्ने होत नाहीत. तसेच, ओठ दुभंगण्याच्या विकारांमुळेही चार टक्के मुलींची लग्ने होत नाहीत. या मोहिमेमुळे समाजाकडून मिळणाऱ्या सापत्नभावातून सुटका होऊन अवघे जगणेच सुंदर होणार आहे.

 “प्रारंभ अर्जुनीपासूनच……” स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक व मंत्री मुश्रीफ हे प्रचारासह प्रत्येक कामाचा प्रारंभ अर्जुनी येथूनच करत. पहिली विधानसभा निवडणुक हरल्यानंतर आभार दौर्याला मुश्रीफांनी येथूनच सुरुवात केली होती. सदृढ आणि आरोग्यदायी पिढी घडावी, यासाठी बालआरोग्य मोहीमेचीही सुरुवात येथूनच होत आहे. या योगायोगाचा उल्लेख मान्यवरांनी वारंवार केला.

  “माणुसकीची भिंत…… “

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, शून्य ते १८ वयोगटातील बालके ही मतदार नाहीत. ही जाणीव असतानाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी केवळ माणुसकीच्या भावनेतून आरोग्य मोहीम हाती घेतली आहे. देशाचा प्रत्येक नागरिक सदृढ आणि सक्षम असावा, या उदात्त हेतूनेच मुश्रीफ फौंडेशनने ॲस्टर आधार हॉस्पिटल व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू केली. ही आरोग्य मोहीम व्याधीग्रस्त बालकांना नवसंजीवनी देणारीच असल्याचे सीईओ चव्हाण यांनी सांगितले.

“अशी आहे आरोग्य मोहीम…..”

हा पहिला टप्पा आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत छोट्या, मध्यम गावात एक दिवस व मोठ्या गावांमध्ये दोन दिवस याप्रमाणे नियोजन केले आहे. यामध्ये हृदयशस्त्रक्रिया, दम लागणे. विशेषता: बालकांच्या हृदयाच्या छिद्रांची शस्त्रक्रिया. तसेच; अस्थीरोग -हाडांचे विविध आजार, मेंदूचे आजार, डोळ्यांचे आजार- तिरळेपणा, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, चष्म्याचे नंबर तपासणी, दुभंगलेले ओठ व दुभंगलेली टाळू, दातांचे आजार दात किडणे, काढणे व नवीन घालणे आदी विकारांच्या तपासण्या शस्त्रक्रिया व औषधोपचार मोफत केल्या जाणार आहेत. हा टप्पा पूर्ण होताच महिलांच्या कर्करोग तपासण्या व औषधोपचाराचे ही मोहीम आयोजित केली जाणार आहे.यावेळी बिद्री साखरचे संचालक प्रवीणसिंह भोसले, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील यांचीही भाषणे झाली.

व्यासपीठावर सरपंच सौ. वर्षा सुतार, उपसरपंच सुनील देसाई, राजन देसाई, रणजित देसाई, तुकाराम देसाई, मयूर आवळेकर, ॲस्टर आधारच्या डॉ. श्वेता गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत शिंदे आदी उपस्थित होते. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *