मुंबई/प्रतिनिधी :
विधानपरिषद निवडणुकीत भाजपने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची मते फोडत पाचवी जागा निवडून आणली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि महाविकास आघाडी समर्थक अपक्ष आमदारांपैकी जवळपास २० मते फोडण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरलेली असतानाच शिवसेनेचे १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. नॉट रिचेबल असलेले सर्व आमदार हे शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असल्याचं सांगण्यात येत आहे
एकनाथ शिंदे हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. शिवसेनेकडून वारंवार ही चर्चा फेटाळून लावण्यात येत असतानाच आता मात्र मोठी घडामोड घडताना पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर काल संध्याकाळपासून शिवसेनेचे १३ आमदार कोणाच्याही संपर्कात नाहीत. निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आमदार उपस्थित होते. मात्र एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची अनुपस्थिती हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे