विशेष वृत्त:कौतुक नागवेकर
सांगली/प्रतिनिधी : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकाच कुटुंबातील नऊजणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला आज, सोमवारी कलाटणी मिळाली. वनमोरे कुटुंबीयांनी आत्महत्या केली नसून, त्यांना विषारी द्रव्य देऊन त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी सोलापूरच्या दोघांना अटक करण्यात आली असून, गुप्तधनाच्या प्रकरणातून हे हत्याकांड घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आब्बास महंमदअली बागवान (वय ४८, रा. मुस्लीम बाशा पेठ, सरवदेनगर, सोलापूर) व धीरज चंद्रकांत सुरवसे (३०, रा. वसंतविहार ध्यानेश्वरीनगर, जुना पुना नाका, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत
म्हैसाळ येथे सोमवार, दि. २० रोजी विष पिल्याने एकाच कुटुंबातील नऊजणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. सकृतदर्शनी तो सामूहिक आत्महत्येचा प्रकार वाटत होता. संपूर्ण राज्यात या प्रकरणाने खळबळ उडाली होती. मृत्यू झालेल्या वनमोरे कुटुंबातील कोणीही मागे राहिले नसल्याने गूढ वाढले होते.सावकारांच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी परिसरातील २५ जणांवर गुन्हा दाखल करून १९ जणांना अटक केली होती. पोलिसांचा अधिक तपास सुरू होता. आता आणखी दोन संशयितांना अटक करत त्या आत्महत्या नसून सर्वांचे खून करण्यात आल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले
अटकेतील दोघे मांत्रिकच?अटक केलेले दोघेही मांत्रिकच असून त्यांनीच गुप्तधनाचे आमिष दाखवून वनमोरे कुटुंबाकडून वारंवार पैसे घेतले होते. घटनेच्या आदल्या रात्रीही संशयित म्हैसाळ येथे येऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, बागवान व सुरवसे हे दोघे नक्की कोण आणि त्यांनी नऊजणांची हत्या का घडवली याबाबत गेडाम यांनी तपास सुरू असल्याचे सांगत अधिक सांगण्याचे टाळले