कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  राजकारणात सरकारे येत असतात आणि जात असतात परंतु; नाराज होऊन खचून न जाता नव्या उर्मीने काम करा, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. पक्ष संघटना मजबूत करा. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना झोपड्यांपर्यंत न्या, असेही ते म्हणाले. 

हसन मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी मोठ्या ताकतीने करा. गोरगरीब जनतेसह कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा आहे. राज्यात स्थापन झालेल्या नव्या सरकारला आमच्या शुभेच्छाच आहेत असे सांगताना ते म्हणाले, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जागृत असला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांची जाणीव असली पाहिजे. अन्याय होईल तिथे मोर्चा हे आपले लोकशाही मार्गाचे अस्त्र आहेच. भविष्यात होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद, तालुका निहाय पंचायत समित्या, नगरपालिका या निवडणुकांचे नियोजनही सक्षमपणे करा. त्यासाठी तालुकानिहाय मेळाव्यांचेही नियोजन करा.

Advertisements

नव्या सरकारकडून अपेक्षा….

हसन मुश्रीफ म्हणाले, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेलाच आहे. त्यातील त्रुटीही दूर केल्या आहेत. या नव्या सरकारने त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. तसेच; ग्रामविकास विभागाने एक रुपयात दहा सॅनिटरी नॅपकिन देण्याचा मोठा निर्णयही घेतला होता. त्याचीही अंमलबजावणी सरकार करेल अशी अपेक्षा आहे. तसेच; आमच्या सरकारने निर्णय घेतलेल्या जनतेच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व्हावी, असेही ते म्हणाले

ओबीसी आरक्षण मिळेल….

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ओबीसी आरक्षण देण्यासाठी आमच्या सरकारने इम्पेरिकल डाटा संकलनाचे काम पूर्णत्वास आणले होते. त्यासंदर्भात १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. तीन किंवा चार तारखेला हा डाटा आयोग सरकारला सादर करणार होता. मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण मिळणारच होते. दरम्यान, केंद्रातही भाजप सरकार असल्यामुळे हे आरक्षण मिळेल, असेही ते म्हणाले.        

यावेळी माजी आमदार के पी पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, केडीसीसी संचालक रणवीरसिंग गायकवाड, केडीसीसीचे संचालक संतोष पाटील, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शितल फराकटे, कार्याध्यक्ष सौ. अस्मिता पवार, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने -पाटील, सरचिटणीस अनिल साळोखे, डॉ. गंगाधर व्हसकोटी आदी प्रमुख उपस्थित होते.

      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *