प्रशिक्षण व स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने हातकणंगले तालुक्यातील महिलांना लाखोंचा गंडा…!

नीपणी: कर्नाटकमधील एक भामटा गृह उद्योगाच्या माध्यमातून महिन्याकाठी हजारो रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून हातकणंगलेसह कागल येथील महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिला भयभीत झाल्या असून, पोलिसांकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संशयित भामट्याचे कार्यालय निपाणी (जि. बेळगाव) येथे आहे. प्रशिक्षण व स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने दामिनी गृह उद्योग या नावाने संस्थेची नोंदणी केली आहे. शिवाय, एका महिलेने २५ सभासद केल्यास त्याने महिना पाच हजार रुपये देण्याची लालूच दाखवली. त्याने महिलांकडून महिन्याला साडेतीन हजार रुपये घेऊन प्रत्येकी दीड ते दोन हजार बटणे व त्यासाठी लागणारा रंग आणि ब्रश पुरवत होता

सुरुवातीला हा व्यवहार सुरळीत होता. त्यामुळे हातकणंगले, कागल तालुक्यांतील महिलांनी पैसे गुंतवले. गेल्या काही दिवसांपासून त्याने संबंधित महिलांकडून सहा हजार रुपये भरून घेऊन त्यांना साहित्यही नाही आणि पैसेही दिले नाहीत, अशी स्थिती आहे. त्याने महिन्याकाठी सहा हजार घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपले नाव वेगवेगळे सांगितले असून, यामध्ये त्याच्या दोन साथीदारांचाही समावेश असल्याची माहिती महिलांनी दिली आहे.

दरम्यान, भामट्याने निपाणी परिसरातील २० हजारांहून अधिक महिलांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली असून, याप्रकरणी निपाणी पोलिसांत गुन्हाही दाखल असल्याचे समजते. हातकणंगले, कागल तालुक्यांतील फसवणूक झालेल्या महिला हवालदिल झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *