मुंबई : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. दिपांकर दत्ता, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. तातेड, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लोकसेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुंबई महापालिका आयुक्त ईक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला आज ध्वजारोहणाची संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्य समजतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच – पावणे तीन वर्षात कोविडच्या भयंकर विषाणूने आपल्याला बंदिस्त केले होते. आज संकट पूर्णपणे गेलेले नाही, पण या विषाणूने घातलेल्या बेड्या आपण सगळ्यांनी तोडल्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण उत्साहाने साजरा करतो आहोत तसेच येणारा गणेशोत्सव, दहीहंडी किंवा इतर धार्मिक सण देखील आपण नेहमीप्रमाणे काळजी घेऊन पण जल्लोषात साजरे करणार आहोत.