केआयटी मध्ये नॅक मार्फत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ विषयावरील राष्ट्रस्तरीय एक दिवसीय कार्यशाळा संपन्न…!

कोल्हापूर : कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (स्वायत्त), कोल्हापूर व इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या सयुंक्त विद्यमाने “उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी व असणारी आव्हाने” या विषयावरील राष्ट्रस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरची कार्यशाळा ही नॅक, बेंगळुरू यांच्या सहाय्याने इंटरनल क्वालिटी अस्यूरन्स सेल (IQAC) च्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून शिक्षण तज्ज्ञ श्री. आनंद मापुसकर तसेच आयआयटी मुंबई चे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. बी. एन. जगताप हे उपस्थित होते व त्यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन झाले. केआयटीचे कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी प्रमुख अतिथी, वक्ते आणि उपस्थितांचे स्वागत केले.

प्रथम सत्रात डॉ. बी. एन. जगताप यांनी जुन्या शैक्षणिक धोरणात कालानुरूप होत गेलेले बदल यांविषयी माहिती देत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील ध्येय, उद्दिष्ट्ये आणि दूरदृष्टी यांवर आपले विचार मांडले. तसेच त्यांनी उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट पुन्हा परिभाषित करणे का आवश्यक आहे याबद्दल मत मांडताना उच्च शिक्षण विभागाची पुनर्रचना, मूल्यांवर आणि कौशल्य आधारित शैक्षणिक आणि संघटनात्मक संरचना, संशोधनाची गुणवत्ता आणि प्रमाण बदलणे, सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळणे, बहुविद्याशाखीय विद्यापीठांमध्ये रूपांतर या व अनेक महत्वाच्या विषयांवर आपले विचार व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात बोलताना श्री. आनंद मापुसकर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये असणाऱ्या संधी आणि आव्हाने यावर बोलताना त्यांनी सदरचे धोरण उच्च शिक्षण संस्थांना (HEI) मोठ्या बहुविद्याशाखीय विद्यापीठे, महाविद्यालये आणि HEI क्लस्टर्स/नॉलेज हबमध्ये एकत्र आणेल असे मत व्यक्त केले. या धोरणामुळे उच्च शिक्षण संस्थांना उपलब्ध होणाऱ्या संधींमध्ये शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वातंत्र्य, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम, मूल्यमापन प्रणालीमध्ये सुधारणा आणि बदल, इंडस्ट्री कनेक्ट, सोशल कनेक्ट यांचा विशेष सहभाग असेल असे विचार त्यांनी मांडले. त्याचबरोबर आर्थिक व्यवस्थापन, नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव, पायाभूत सुविधा, व्यवस्थापकीय भूमिकेचे आकलन, डोमेन ज्ञानाचा अभाव, संस्थात्मक विकास योजना तसेच वेगवेगळ्या HEI साठीच्या स्वतंत्र नियमांचा अभाव या व अशा आव्हानांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

तिसऱ्या सत्रात केआयटीच्या डॉ. महेश शिंदे यांनी “ओपन डिजिटल लर्निंग व त्याचे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील महत्व” या विषयावर मार्गदर्शन केले. तर चौथ्या सत्रात केआयटीच्या डॉ. कपिल कदम यांनी “मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स (MOOCS) डिझाईन करणे” याविषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यशाळेस कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, सोलापूर, बेळगाव व इतर ठिकाणाहून एकूण १७० प्राध्यापक उपस्थित होते.

केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव श्री. दिपक चौगुले, केआयटीचे कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, अभियांत्रिकीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, आयएमईआर चे संचालक डॉ. मुकेश गोयल आणि रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार यांचे आयोजकांना मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यशाळेच्या आयोजनासाठी संयोजक डॉ. अक्षय थोरवत, आयोजन सचिव डॉ. ग्रंतेज ओतारी व प्रा. मुजिर मकानदार, प्रा. भारत इंगवले, प्रा. किरण कांगले, प्रा. सौरभ जोशी, प्रा. रणजित भोसले, डॉ. मनोज यादव, प्रा. ओंकार सूर्यवंशी, प्रा. समर्थ शिरोळ, प्रा. निखिलेश सौन्दत्तीकर, प्रा. पल्लवी ढेकणे, एन. टी. पाटील आणि इतर शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. क्षितिजा ताशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *