सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्या महिलांना शाहूपुरी पोलिसांकडून अटक….!

कोल्हापूर : एस.टी. स्टँड वर बस मधून उतरणाऱ्या  महिलेच्या बॅगेतून सुमारे ८ लाख रु किमतीचे दागिने असलेली पिशवी लंपास करणाऱ्या दोन चोरट्या महिलांना पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नकुशा बाबासो सकट (वय ४५, मानेनगर, गणेश फौंड्रीमागे, रुई) आणि सुभद्रा कल्लाप्पा चौगले (वय ५७, शिवाजी तालीमजवळ हातकणंगले) अशी अटक केलेल्या दोन चोरट्या महिलांची नावे आहेत. ही कारवाई शाहूपुरी पोलिसांनी केली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राधानगरी तालुक्यातील कौलव येथे राहणारे तानाजी सावंत वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांचे वाळवा (जि.सांगली) येथे मुळ गाव आहे. नवरात्रौत्सवात देवाला तेल घालण्यासाठी रविवारी ते पत्नी लता यांच्यासह एस.टी.बसने जात होते. दरम्यान मध्यवर्ती बसस्थानकात बसमधून उतरत असताना लता यांच्या बँगेतील ८ लाख किंमतीचे १७ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले

Advertisements

याबाबतची फिर्याद सावंत दाम्पत्यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. त्यानूसार शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, हवालदार ऋषिकेश पवार, युवराज पाटील, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखन पाटील, सागर माने, राहूल कांबळे, सविता सुतार यांनी तपासाला सुरूवात केली. सीसीटिव्ही फुटेज तपासून पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे सक्रीय केले. रात्रभर हातकणंगले परिसरात शोध घेऊन संशयित नकूशा सकट आणि सुभद्रा चौगले या दोघींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या दोघींची झडती घेतली असता त्यांच्याकडून सोन्याचे गंठण, तबकसहित गंठण,लक्ष्मीहार, कोल्हापूरी साज, राणीहार, अंगठी असे एकूण १७ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या पथकाला पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी दहा हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *