कोल्हापूर दि २० : चीन मधून सुरु झालेले कोरोना विषाणूचे संकट जगभरात वेगाने पसरत आहे. सध्या कोरोना जागतिक संकट बनले आहे. प्रत्येक देश आपआपल्या पातळीवर यासाठी दक्षता घेत आहे. यासाठी २२ मार्चचा जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होऊन नागरी कर्तव्याचे पालन करु असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.
काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना या विषाणूचा प्रदृभाव रोखण्यासाठी उपयायोजना म्हणून संबोधित केले. यावेळी त्यांनी रविवार दिनांक २२/०३/२०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत देशभरात जनता कर्फ्यूच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. जनता कर्फ्यू म्हणजे स्वत:च्या सुरक्षेसाठी, स्वत:ने स्वत:वर घातलेले निर्बंध होय. या मागील उद्देश म्हणजे कोरोना विषाणू एखाद्या पृष्ठभागावर १२ तासापर्यंत सक्रीय असतो, तर जनता कर्फ्यू च्या माध्यमातून आपण सर्वजन १४ तासांमध्ये त्या पृष्ठभागाला स्पर्श करू शकणार नाही. यामुळे विषाणू प्रसार होण्याची प्रक्रिया रोखली जाणार आहे. “एका प्रकारे आपला आत्म संयम किती आहे, याचीच ही परीक्षा आहे, कारण कोरोनाच्या रूपाने आलेल्या जागतिक संकटावर आपण संकल्प आणि संयम या दोन गोष्टींच्या आधारावरच यशस्वीरित्या मात करू शकतो.
भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष या नात्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहानाला प्रतिसाद म्हणून रविवार दिनांक २२/०३/२०२० रोजी होणाऱ्या जनता कर्फ्यू मध्ये सर्वांनी सामील होऊन आपली देशाप्रती असणारी भूमिका निभवावी. २२ रोजी संपर्ण दिवस क्वारंटाईन व्हावे तसेच स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ‘राष्ट्ररक्षकांप्रती’ घरी , टेरेसवरून सायंकाळी ५ वाजता ५ मिनिटे टाळ्या वाजवून किंवा वाद्ये वाजवून कृतज्ञता व्यक्त करावी. राष्ट्र आणि सर्व मानव जातीच्या हितासाठी आपण शहरवासियांनी आपल्या नागरी कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन चिकोडे यांनी केले आहे.