कोल्हापूर : ” कॉम्प्युटर सायन्स व बिझनेस सिस्टिम्स या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येत्या काळात संबंध जगताला कुशल कर्मचारी पुरवेल”, असे मत टीसीएसचे अकॅडेमिक इंटरफेज प्रोग्रॅम चे भारत स्तरावरील व्यवस्थापक श्री.चंद्रा कोडरु यांनी व्यक्त केले ते कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व केआयटी यांच्यामधील सामंजस्य करार व केआयटी येथील टीसीएस कंपनी पुरस्कृत कॉम्प्युटर सायन्स व बिझनेस सिस्टिम्स या पदवी अभ्यासक्रम विभागाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी टीसीएस शैक्षणिक संस्था संपर्क अधिकारी ऋषिकेश धांडे उपस्थित होते तर केआयटीच्या वतीने चेअरमन सुनील कुलकर्णी, व्हा. चेअरमन साजिद हुदली, सेक्रेटरी दीपक चौगुले, विश्वस्त सचिन मेनन, कार्यकारी संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी व संचालक डॉ.मोहन वनरोट्टी हे उपस्थित होते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुरस्कृत बी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम्स् या अभ्यासक्रमाची मान्यता पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित केआयटी महाविद्यालयाला मिळाली आहे. देशात आणि महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणच्या महाविद्यालयांना हि मान्यता मिळाली असून, कोल्हापूरसाठी ही गौरवपूर्ण बाब आहे. आज सामंजस्य करार आणि उदघाटन असा दुहेरी कार्यक्रम केआयटी मध्ये संपन्न झाला. सामंजस्य करारांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, प्लेसमेंट, इंटर्नशिप्स, प्रकल्प अशा महत्वपूर्ण बाबींचा लाभ केआयटीला होणार आहे.
कोडरू यांनी त्यांच्या भेटीत केआयटी मधील विविध उपक्रमांची माहिती घेऊन केआयटीमध्ये झालेल्या उत्तम ऍडमिशन्स व पालक विश्वासाचे कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी केआयटीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना भविष्याबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यकारी संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी यांनी केआयटीची परंपरा व आजपर्यंतची वाटचाल याबद्दल माहिती दिली. सुनील कुलकर्णी, साजिद हुदली, दीपक चौगुले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अधिष्ठाता डॉ. अमित सरकार, अधिष्ठाता डॉ अजित पाटील, सीएसबीएस विभागप्रमुख डॉ. लिंगराज हद्दीमनी, रजिस्ट्रार डॉ. मनोज मुजुमदार उपस्थित होते.